मुंबई : शिवसेनेसमोर अडचणी काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही. एकीकडे धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. तर दुसरीकडे आता उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपत आली आहे. त्यामुळे अवघ्या 12 दिवसांमध्ये यावर कसा तोडगा निघणार हे पाहण्याचे ठरणार आहे.
धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे मंगळवारी सुनावणी पार पडली पण अजून कोणताही निर्णय झालेला नाही. अशातच उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत संपत आली आहे. अवघे बारा दिवस उरले आहे. 23 जानेवारी 2023 ला उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची पाच वर्षे पूर्ण होणार आहे. निवडणूक आयोगात पक्षाचा संघटनात्मक पेच फसला असताना शिवसेनेत चिंतातुर वातावरण पसरले आहे.
पुन्हा कार्यकारिणीची बैठक घेऊन संघटनात्मक निवडणुकांसाठी शिवसेनेची आयोगाला विनंती करणार आहे. 2018 मध्ये कार्यकारणीच्या बैठकीत पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची दुसऱ्यांदा निवड झाली होती. मात्र, मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान या मुद्यावर निवडणूक आयोगाचा कुठलाच प्रतिसाद नव्हता. आता पुढच्या सुनावणीमध्ये तरी दिलासा मिळणार का याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, शिवसेना पक्षांतर्गत लोकशाही पद्धतीनं निवडणूक होते. वर्षानुवर्षे ही निवडणूक होत आली आहे. १९६६ पासून शिवसेना रजिस्टर्ड पक्ष आहे. १९६६ नंतर सर्व निवडणूका शिवसेनेनं लढवल्या आहेत. १९८९ मध्ये निवडणूक आयोगाकडून चिन्ह मिळालं. लोकशाहीच्या मुल्याप्रमाणे निवडणूक झाल्या आहेत, अशी माहिती अनिल देसाई यांनी दिली.