रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला असून अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. रायगड जवळील रेपोली गावाजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. दरम्यान, अपघाताचं कारण मात्र अद्याप अस्पष्टच आहे. अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. तसेच, अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी मार्गावरील अपघातग्रस्त वाहानं बाजूला करुन वाहतूक पूर्ववत केली आहे.
कसा झाला अपघात? प्रत्यक्षदर्शींनी दिली माहिती
रायगडमधील माणगावजवळ रेपोली इथे कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली आणि भीषण अपघात झाला. या अपघातात नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, इको कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. गोरेगाव हद्दीतील रेपोलीनजीक पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात गाडीचा चक्काचूर झाला आहे. तर गाडीतून प्रवास करणाऱ्या नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मृतांचे शवं माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
देव तारी त्याला कोण मारी, अपघातात चार वर्षीय चिमुकला बचावला
मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना आज (गुरुवारी) पहाटेच्या वेळी मुंबई-गोवा महामार्गावर घडली. मुंबई-गोवा महामार्गावरील गोरेगाव हद्दीतील रेपोलीजवळ आज पहाटेच्या सुमारास कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कार आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली आणि अपघात झाला. या अपघातात कारमधील सर्वच्या सर्व 9 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच, या अपघातात 5 महिन्यांचं बाळ बचावल्याची माहिती मिळत आहे.
खोळंबलेली वाहतूक पूर्ववत
पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाचा पंचनामा करुन वाहतूक सुरळीत केली. तसेच, अपघातात दगावलेल्या व्यक्ती नेमक्या कुठच्या होत्या, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta