मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीची चर्चा पाहायला मिळत आहे. या शपथविधीची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना देखील होती, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले आहे. मात्र यातच आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पहाटेच्या शपथविधीची माहिती शरद पवारांप्रमाणे संजय राऊतांना देखील होती असे वक्तव्य शिरसाट यांनी केले आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, पहाटेच्या शपथविधीबाबत संजय राऊत यांना देखील माहिती होती. संजय राऊत पडद्यामागून काम करत होते. त्यांना हे प्रकरण माहित होते. त्यामुळे पहाटेचा शपथविधी घडवून आणण्यामागे संजय राऊत यांचा मोठा वाटा असल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यामुळे शिरसाट यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे.
संजय राऊत सायको आहेत, ते कधी काय बोलतील आणि कोणाला अडचणीत आणतील हे सांगताच येत नाही. उद्धव ठाकरे यांची जी अडचण वाढली आहे, ती फक्त या सायको भुमिकेने झाली आहे. संजय राऊत वक्तव्य करतात आणि ते निस्ताराचे काम उद्धव ठाकरे यांना करावे लागत होते. हे सर्व उद्धव ठाकरे यांना देखील माहित आहे. तर सायकोपणा करणे आणि जे घडलं नाही त्यावर भाष्य करणे यात राऊत यांना आनंद मिळत असल्याचे देखील संजय शिरसाट म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta