मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील जनतेला जय बजरंग बली असे बोलून मतदान करण्यास सांगितले आहे. मात्र कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र म्हणजे सीमा भागातील मराठी भाषिकांनी ‘जय भवानी जय शिवाजी’ असे बोलून मतदान करावे, असे आवाहन शिवसेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी केले आहे.
मुंबई येथे प्रसारमाध्यमांची बोलताना शिवसेना प्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे म्हणाले की, बऱ्याच वर्षांपूर्वी हिंदुत्वाचा प्रचार केल्याबद्दल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता.
आत्ताचे माननीय पंतप्रधान कर्नाटकातील मतदारांना ‘बजरंग बली की जय’ असे बोलून मतदान करायला सांगत असतील तर मी कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रातील मराठी जनतेला आवाहन करतो की तुमच्यावर प्रत्येक पक्षाच्या सरकारने अन्याय -अत्याचारच केला आहे. तेंव्हा तुम्ही सुद्धा मतदान करताना ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ किंवा ‘जय शिवाजी’ बोलून मतदान करावे. आपल्या मराठी माणसांची एकता जपणाऱ्या उमेदवाराला मतदान करावे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडून आणावे. कालच संजय राऊत तेथे जाऊन आले आहेत.
कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रातील माझ्या तमाम मराठी माणसांना मी आवाहन करतो की ज्याप्रमाणे मोदीजींनी सांगितलय की जय बजरंग बली म्हणून मतदान करा असे आवाहन केले आहे. तसे तुम्ही वाटल्यास ‘जय भवानी, जय शिवाजी’ बोलून मतदान करा. मात्र मराठी माणसांची एकजूट तुटू देऊ नका. त्या एकजुटीची वज्रमूठ दाखवून द्या.
महाराष्ट्रातील नेते त्या ठिकाणी जाऊन समितीच्या विरोधात भाजप व काँग्रेसचा प्रचार करत असल्यामुळे तेंव्हा तेथील मतदारांनी आता ठरवला पाहिजे. त्यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’ बोलून मराठी भाषेचे हितरक्षण करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारालाच विजयी केले पाहिजे, असेही उद्धवजी ठाकरे यांनी स्पष्ट केले.