Friday , November 22 2024
Breaking News

लोकसभेसाठी ‘मविआ’ची मोर्चेबांधणी सुरु : संयुक्त पत्रकार परिषदेत संकेत

Spread the love

 

मुंबई : आगामी निवडणुका एकत्र लढण्याकरिता सर्व घटक पक्षांना एकत्रित बोलावून निर्णय घेणार आहाेत. आगामी लाेकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावरही आम्‍ही चर्चा करणार आहाेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज (दि. १४) संयुक्‍त पत्रकार परिषदेत दिली. राज्‍यातील महाविकास आघाडीची आज सिल्वर ओकवर बैठक झाली. या बैठकीनंतर आयाेजित संयुक्‍त पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष नाना पटाेले, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपस्‍थित होते.

या वेळी जयंत पाटील म्‍हणाले की, “आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली. कर्नाटक विधानसभा निवडणूकीत भाजपचा मोठा पराभव झाला. याबाबतच्या सर्व मुद्दयांवर आमची आजच्या बैठकीत चर्चा झाली. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्‍च न्‍यायालयाने नुकताच निकाल दिला आहे. आता याबाबत पुढील निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आला आहे. या निकालात सर्वोच्‍च न्‍यायालयाने सरकार स्‍थापनेच्‍या घटनाक्रमावर कडक ताशेरे ओढले आहेत. आम्‍ही हा निकाल घेवून जनतेसमाेर जाणार आहाेत.”

महाविकासआघाडीच्या वज्रमुठ सभेबाबत बोलत असताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात वाढत्या तापमानामुळे वज्रमुठच्या काही सभा रखडलेल्या आहेत. या सर्व सभा तापमान कमी झाल्यानंतर घेण्यात येतील, असेही पाटील यांनी सांगितले.

नाराजी कुठेच नाही, आम्ही सगळेजण एकत्र : नाना पटोले
महाविकास आघाडीमध्‍ये नाराजी कुठेच नाही. आम्ही सगळेजण एकत्र आहोत. आज सर्वांनी एकत्र येऊन बैठक देखील घेतली आहे. भाजप याबाबतच्या चर्चा घडवून आणत आहे, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली. लवकरच वज्रमुठ सभांना सुरुवात करु. कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा आम्ही सत्कार देखील करणार आहोत, अशी माहिती देखील पटोलेंनी दिली.

मोकळ्या मनांनी आमच्यात चर्चा झाली : संजय राऊत
आजच्‍या बैठकीत मोकळ्या मनांनी आमच्यात चर्चा झाली . सर्वोच्च न्यायालयाचा निकाल खऱ्या शिवसेनेच्या बाजूने आहे. जनतेला आम्ही सांगू हे सरकार असंवैधानिक आहे. मविआचे तीनही पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे आम्ही मजबुत आहोत, असे संजय राऊत यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

भाजपची 22 जणांची दुसरी उमेदवार यादी जाहीर

Spread the love  मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *