मुंबई : सर्वच पक्षांकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. सध्या युती आणि आघाडीमध्ये घटक पक्षांच्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची चिन्ह असतानाच आता मित्र पक्षाकडून भाजपला देखील इशारा देण्यात आला आहे. कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव झाल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये भाजपचा मित्र पक्ष असलेल्या रासपच्या महादेव जानकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मविआतही बिघाडी?
दरम्यान दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये देखील जागा वाटपावरून बेबनाव असल्याचं समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये ठाकरे गटानं वीस जागांवर दावा केल्याची माहिती समोर येत आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून समान जागा वाटपाचा दावा करण्यात येत आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आमचे 18 खासदार निवडून येतील असा दावा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहे.