Monday , December 8 2025
Breaking News

आमदार आशिष देशमुखांची काँग्रेसमधून 6 वर्षासाठी हकालपट्टी

Spread the love

 

नागपूर : डॉ. आशीष देशमुख यांची काँग्रेस पक्षातून पुढील ६ वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसमध्ये सतत वादग्रस्त ठरत असल्याने तसेच कधी राष्ट्रवादी तर कधी भाजपशी जवळीक साधण्याच्या प्रयत्नात असल्याने त्यांना निलंबित करण्यात आले होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्वाक्षरीनिशी हे पत्र नागपुरात धडकल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

आशिष देशमुख यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. अलिकडेच आशिष देशमुख आणि भाजपमध्ये जवळीक वाढल्याचे दिसून येत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी भेटीगाठी वाढल्या होत्या. पक्ष आपल्याला काढणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. त्यांच्या राजकीय हालचाली पाहून अखेर काँग्रेसने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवल्याचे बोलले जात आहे. अर्थातच कधीकाळी काटोल मतदारसंघातुन भाजपचे आमदार असलेले देशमुख या कारवाईनंतर नेमकी काय भूमिका घेतात ते कुठल्या पक्षाची वाट धरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मूळ काँग्रेसच्या विचारांचे असलेले देशमुख यांनी काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी काटोल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि काकांचा पराभव केला होता. मात्र, आमदार देशमुख यांना भाजपमध्ये फार काळ राहता आले नाही. वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर त्यांनी भाजपच्या नेतृत्वावर टीका करीत तीन वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसतर्फे नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात ते लढले. आता ते पुन्हा भाजपशी जवळीक साधत काटोल किंवा सावनेर मतदारसंघात डोळा ठेवून असल्याची चर्चा आहे. 29 मे रोजी माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते पुढील भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.

About Belgaum Varta

Check Also

धनंजय मुंडेंनी अडीच कोटींची सुपारी दिली; मनोज जरांगेंचा सर्वात मोठा आरोप

Spread the love  मुंबई : धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप मराठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *