इटकरे : -वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथे नदीकाठी वैरण आणण्यासाठी गेलेल्या सख्या मावस भावांचा वारणा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली होती. शनिवारी सकाळी दोघांचे मृतदेह नदीपात्रात सापडले. अमोल प्रकाश सुतार (वय १६, रा. तांदुळवाडी) व रविराज उत्तम सुतार (वय १२ रा. सदाशिवगड, राजमाची, ता. कराड, जि. सातारा) अशी या दुर्देवी मुलांची नावे आहेत. या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मयत अमोल सुतार हा आठवडाभर सुट्टीला आलेल्या मावसभाऊ रविराज याला घेऊन शुक्रवारी वारणा नदीकाठावर असलेल्या आपल्या शेतामध्ये वैरण काढण्यासाठी गेला होता. घरातून बहिणीने दुपारी दोन वाजता फोन केला, तेव्हा त्याने वैरण काढत असल्याचे सांगितले. पण त्यानंतर वारंवार फोन केला तरी फोन उचलला जात नव्हता. त्यामुळे सकाळी वैरणीसाठी गेलेली मुले अजून का आली नाही म्हणून घरचे लोक त्यांना पाहण्यासाठी शेतात गेले.
त्यावेळी दोघेही शेतात नव्हते. त्यामुळे त्यांचा शोधाशोध सुरु केला. तेव्हा नदी काठावर त्यांचे कपडे, चप्पल, मोबाईल दिसून आले. त्यामुळे ते नदीत बुडाले असावेत असा संशय व्यक्त होऊ लागला. या घटनेची माहिती कुरळप पोलिस ठाण्यात देण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून शोधमोहीम सुरु केली. परंतु अंधार झाल्यामुळे ही शोधमोहीम थांबविण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta