रायगड (नरेश पाटील) : रायगड किल्ले येथील महाराष्ट्र शासनतर्फे आयोजित शिवराज्यभिषेक सोहळ्याला संकेश्वर येथील शिवप्रेमी ओंकार भिसे हजर होता. किल्ला चढताना उष्माघाताने त्याचे वाटेतच निधन झाले. महाराष्ट्र शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे ओंकारला जीव गमवावा लागला. त्यामुळे त्याच्या कुटुंबाला शासनातर्फे ताबडतोब आर्थिक मदत ताबडतोब मिळण्याची मागणी मनसे अध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांनी केली आहे.
पत्रकारांशी बोलताना देवेंद्र गायकवाड म्हणाले, देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्यभिषेक सोहळा महाराष्ट्र शासनाने किल्ले रायगडावर आयोजित केला होता. सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी संकेश्वरचा शिवभक्त ओंकार दिपक भिसे (वय २१) आणि त्यांचे ११ शिवभक्त मित्र आले होते. ओंकार आपल्या साथीदारांसमवेत किल्ला चढताना वाटेतच त्याला मृत्यूने कवटाळले. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती शवविच्छेदन अहवालातून (पोस्ट मार्टम रिपोर्ट) मधून समजणार आहे. ओंकार भिसे यांच्या मृत्यूला शासनच जबाबदार असल्याचे उत्तर- दक्षिण रायगड जिल्ह्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष देवेंद्र गायकवाड स्पष्टपणे म्हटले आहे. ते पुढे म्हणाले, ओंकार यांच्या कुटुंबियाला महाराष्ट्र शासनाने तात्काळ आर्थिक मदत देण्याची गरज आहे. २ जून २०२३ रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याच दिवशी ओंकारचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यामुळे ओंकारच्या कुटुंबाला शासनाने जास्तीत जास्त मदत द्यायला हवी असल्याचे त्यांनी सांगितले.