लोकप्रियतेची टक्केवारीही बेरीज करून सादर
मुंबई : शिवसेनेनं सोमवारी सर्व वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीमुळे राजकारण तापलं होतं. त्यातच आज शिवसेनेनं पुन्हा पहिल्या पानावर जाहिरात दिली आहे. या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचा फोटो आहे. तसंच, वरच्या बाजूला बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे फोटो दिसत आहेत.
कालच्या जाहिरातीवर मोठं वादंग उठल्यानंतर जाहिरातीतील चूक दुरुस्त करण्यात आलेली आहे. आज पुन्हा एकदा वर्तमानपत्रामध्ये नव्यानं जाहिराती देण्यात आल्या आहेत. या नव्या जाहिरातीमध्ये मात्र एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांचा फोटो झळकतो आहे. दोघांच्या नेतृत्वाला महाराष्ट्राची साथ दिली आहे, अशी ग्वाही दिली जात आहे. नरेंद्र मोदी यांच्या साथीनं विकासाचे पर्व महाराष्ट्रात आलं आहे, असं सांगितलं जात आहे. महत्त्वाचं म्हणजे, कालच्या जाहिरातीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना डिवचण्याचा प्रयत्न झाला होता, तो दुरुस्त केला गेला आहे.
आज देवेंद्र फडणवीस यांचा भला मोठा फोटो त्यासोबतच भारतीय जनता पार्टीचे चिन्ह असलेलं कमळ त्याच्या जोडीला शिवसेनेचे धनुष्यबाण प्रकाशित करण्यात आलेला आहे. या सरकार मधल्या महत्त्वाच्या मंत्र्यांचे फोटो ही प्रकाशीत करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची मोठी आहे. काल प्रकाशित झालेल्या जाहिरातीनंतर मुख्यमंत्र्यांनी आपण ही जाहिरात दिलेलीच नव्हती अशी भूमिका घेतली. कोल्हापूर मधल्या जाहीर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केलं. एक प्रकारे आज केलेली चुकीची दुरुस्ती ही एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या दबावासमोर माघार घेतल्याचं दिसत आहे.
काल शिवसेनेकडून (शिंदे गट) महाराष्ट्रातील जवळपास सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देण्यात आली होती. ‘देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ अशा आशयाची ही जाहिरात होती. तसेच, या जाहिरातीत मुख्यमंत्रीपदासाठी 26.1 टक्के जनतेची शिंदेना तर 23.2 टक्के जनतेची पसंती फडणवीसांना असल्याचा उल्ले जाहीरातीत करण्यात आला होता. त्यामुळे भाजपमधून नाराजीचा सूर आवळला होता. आज अखेर शिवसेनेकडून याप्रकरणी सारवासारव करुन दुसरी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जाहिरातीवरुन शिंदे गटाचा सामनातून खरपूस समाचार
शिवसेनेनं काल सर्व वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीवरून सामन्यातून खरपूस टीका करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरेंबाबत शिंदेंचं प्रेम हे केवळ ढोंग आहे, असे ताशेरे सामनाच्या अग्रलेखात ओढण्यात आले आहेत. राष्ट्रात 2024 नंतर मोदींचे राज्य राहणार नाही, आणि महाराष्ट्रातही सत्तापालट होईल, असा दावाही सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.