पुणे : मान्सूनला गती मिळण्यासाठी वातावरण अनुकूल होत असून तो मुंबई-पुणे शहरांसह राज्यातील बहुतांश भाग 18 ते 22 जूनदरम्यान व्यापणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. मान्सून 11 जूनपासून रत्नागिरीतच अडखळला आहे. कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले नाही. तसेच बिपरजॉय चक्रीवादळाने बाष्प पळवून नेल्याने मान्सूनचा मार्ग काही काळ रोखला गेला होता. मात्र, गुरुवारी दुपारी पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ अनुपम कश्यपि यांनी दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात मान्सून लवकरच मुसंडी मारण्याच्या तयारीत आहे.
गुरुवारी दुपारी मान्सूनने गती घेतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. दक्षिण भारतात त्याने विस्तारण्यास प्रारंभ केला आहे. त्याचबरोबर अरबी समुद्रासह महाराष्ट्र आणि केरळ किनारपट्टीवर तो जोरदार सक्रिय होत आहे. त्यामुळे मुंबई व पुणे शहरासह संपूर्ण राज्यात मान्सून 18 ते 22 जूनदरम्यान पुढे जाईल. मात्र, उत्तर महाराष्ट्र व विदर्भात त्याला जाण्यास आणखी वेळ लागेल, असाही अंदाज कश्यपि यांनी वर्तविला आहे.
बिपरजॉयचा राज्यावर प्रभाव नाही
अरबी समुद्रात तयार झालेले बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी रात्री गुजरात किनारपट्टीवर धडकले. गुरुवारी सायंकाळी ते द्वारका, जखाऊ बंदर, नलिया बोरबंदरपासून 170 ते 290 कि.मी. इतके जवळ होते. (उद्या शुक्रवारी) ते पाकिस्तानमधील कराचीजवळ जाईल व तेथेच ते शमणार आहे. या वादळाचा महाराष्ट्रावर फार परिणाम दिसणार नाही. कोकणात दोन दिवस हलका ते मध्यम पाऊस होईल.
Belgaum Varta Belgaum Varta