मुंबई : मला विरोधी पक्षनेत्यांमध्ये फार काही रस नव्हता. मी एक वर्ष विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळली आहे. आता मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी खळबळजनक मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाकडे केली आहे. या मागणीमुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा २५ वा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन सोहळा माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात बुधवारी आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात बोलताना अजित पवार यांनी शरद पवारांच्या समोरच आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली. यावेळी मला संघटनेत तुम्हाला जे पद योग्य वाटेल ते द्या. त्या पदाला योग्य न्याय मिळवून देईन असे सांगत पक्षात सक्रिय होण्याची मागणी अजित पवार यांनी केली. अजित पवार यांच्या या पवित्र्याने राष्ट्रवादीत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
मागील तीस वर्षात अनेक महत्वाची पदे भूषवली. त्यामुळे यावेळी विरोधी पक्षनेते पद स्विकारण्यात मला रस नव्हता. पण आमदारांच्या आग्रहामुळे मी विरोधी पक्षनेतेपद स्विकारले. पण, आता बस्स झाले, मला विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि पक्षसंघठनेत कोणतेही एखादे पद द्या, अशी मागणी अजित पवारांनी केली. मला पक्ष संघटनेत जबाबदारी दिली तर मग बघा पक्षसंघठन कसे मजबूत करतो, असेही अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रफुल पटेल, सुप्रिया सुळे तसेच पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते समोर बसले असतानाच अजित पवार यांनी हा भूकंप केला.