अपात्रतेसंदर्भात म्हणणं मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत
मुंबई : शिवसेना शिंदे गटाच्या 16 आमदारांविरुद्धच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकरच निर्णय घेणार आहेत. त्यातच आता शिवसेनेच्या 40 आमदार आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना अपात्रतेसंदर्भात म्हणणं मांडण्यासाठी नोटीस जारी करण्यात आली आहे. विधीमंडळाकडून नोटीस जारी करताना आमदारांना म्हणणं मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
अपात्रतेविरोधातील कारवाई टाळण्यासाठी आमदारांना सर्व पुरावे सादर करावे लागणार आहेत. निवडणूक आयोगाकडून विधीमंडळाला शिवसेनेच्या घटनेची प्रत प्राप्त झाली आहे. शिवसेनेच्या घटनेचा अभ्यास करुन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र ठरवण्यात यावं यासाठीची ठाकरे गटाची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे दाखल आहे. त्यासाठी ठाकरे गटाकडून अनेकदा स्मरण पत्रही देण्यात आलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले आहेत. यामुळे आता नोटीस देऊन राहुल नार्वेकर हे एकनाथ शिंदेंसह इतर आमदारांबाबत कार्यवाहीची सुरुवात करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर 90 दिवसांच्या विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta