मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरु असतानाच आता शिंदे-फडणवीस सरकारचा आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार होऊ घातला आहे. हा मंत्रिमंडळ विस्तार आज संध्याकाळी पार पडण्याची शक्यता आहे. मात्र, खातेवाटपाचा तिढा हा काही केल्या सुटायला तयार नाही. मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या खात्यांवरुन सध्या रस्सीखेच पाहायला मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार यांचा गट तीन महत्त्वाच्या खात्यांवर अडून बसला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथम मंत्रिमंडळ विस्तार करा आणि नंतर योग्यवेळी खातेवाटप करु, असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर खातेवाटपाची चर्चा सुरु झाली होती. गेल्या दोन दिवसांमध्ये मुख्ममंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात दोन मॅरेथॉन बैठका झाल्या आहेत. वर्षा बंगल्यावर रात्रीच्यावेळी हे तिन्ही नेते बराच काळ राजकीय खलबतं करत होते. मात्र, खातेवाटपाचा तिढा काही सुटलेला नाही. अजित पवार यांचा गट महसूल, अर्थ आणि जलसंपदा या तीन खात्यांसाठी अडून बसला आहे. महसूल खाते हे सध्या राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे आहे. तर अर्थ आणि जलसंपदा ही दोन्ही खाती सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. मात्र, अजित पवार यांना अर्थखाते देण्यास शिंदे गटाच्या आमदारांचा तीव्र विरोध आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी त्यांच्या गटाच्या आमदारांनी तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार हे निधीवाटपात भेदभाव करत असल्याचा आरोप केला होता. आता अर्थखाते पुन्हा अजित पवार यांच्याकडेच गेल्यास ते पूर्वीप्रमाणेच कारभार करू शकतात, असे शिंदे गटाचे म्हणणे आहे. त्यामुळे आता यावर काय तोडगा निघणार, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta