मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पवार गटाची आज (5 ऑगस्ट) दुपारी एक वाजता बैठक होणार आहे. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर इथे शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. 15 ऑगस्टनंतर सुरु होणारा शरद पवार यांचा दौरा, जर पक्ष चिन्ह गेलं तर ते कोणतं असावं, प्रतिज्ञापत्र भरण्याची सद्यपरिस्थिती या विषयावर बैठकीत प्रामुख्याने चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे युवकचे पदाधिकारी आमदार रोहित पवार हे देखील बैठकीला उपस्थित असणार आहेत.
बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा?
राष्ट्रवादी काँग्रेसमधून फूट पडून महिना झाला आहे. त्यातच अजित पवार यांच्यासोबत जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आगामी काळात पक्ष चिन्ह गेलं तर काय करायचं, ते कोणतं असावं या अनुषंगाने या बैठकीत चर्चा होणार आहे. यासोबतच शरद पवार 15 ऑगस्टनंतर महाराष्ट्र दौरा करणार आहे. बीड, उस्मानाबादमधून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. या दौऱ्याचं नियोजन कसं असावं याबाबतही माहिती घेतली जाणार आहे. त्याआधी रोहित पवार हे 9 ऑगस्टपासून दौरा सुरु करणार असून पुढे जाऊन पाहणी करणार आहेत. त्यानंतर शद पवार त्या त्या ठिकाणी जाणार असल्याची माहिती आहे. याशिवाय शरद पवार याच्या आगामी कार्यक्रमांबाबत, दौऱ्याबाबत देखील चर्चा होणार आहे. सध्या शरद पवार गटाला जास्तीत जास्त प्रतिज्ञापत्र भरुन केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जमा करायची आहेत. याची सध्या काय परिस्थिती आहे याची माहिती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून घेतली जाणार आहे.