स्वाभिमानीमध्ये फूट पाडण्याचा डाव
पुणे : शेतकऱ्यांसाठी काम करणारी संघटना अशी ओळख असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मागच्या काही दिवसांपासून कुरबुर पाहायला मिळतेय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर मागच्या काही दिवसांपासून नाराज आहेत. त्यांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. अशातच संघटनेतील या बाबींवर चर्चा करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुण्यात बैठक बोलावली आहे. पण या बैठकीआधी त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
पक्ष आणि संघटना फोडण्याचं भाजपचं अधिकृत काम आहे. मागच्या काही दिवसांपासून आपल्याला राज्यात ते दिसत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत जे घडतंय यामागे सुद्धा भाजप असल्याचा संशय आहे, असं राजू शेट्टी म्हणालेत.
भाजपकडून ऑफर दिली जाते, निश्चितच संशयाला जागा आहे. याआधी शिवसेना, राष्ट्रवादी आणि याआधीही शेतकरी संघटनेत जे झालं आहे. त्यामुळे आताही जे घडतंय. त्यामागे भाजप असण्याची शक्यता आहे, असं राजू शेट्टी म्हणालेत.
आजच्या बैठकीला रविकांत तुपकर यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. बैठकीसमोर येऊन तुपकरांनी आपलं म्हणणं मांडावं, असंही ते म्हणालेत.
तीन चार दिवसांपासून रविकांत तुपकर काही वक्तव्य करत आहेत. त्याविषयी त्यांचं म्हणणं जाणून घेण्यासाठी ही बैठक बोलावली आहे. आतापर्यंत रविकांत यांनी माझ्याशी किंवा संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी त्याबद्दल चर्चा केलेली नाही. संघटना म्हटलं की कुरबुरी होत असतात. त्यासाठी आम्ही एक व्यवस्था निर्माण केली आहे, असं ते म्हणाले.
एखाद्या कार्यकर्त्याला जर काही अडचण असेल. तर त्याला त्याचं म्हणणं मांडण्यासाठी शिस्तपालन समिती तयार केली आहे. त्या समिती समोर रविकांत यांनी आपलं म्हणणं मांडायला हवं होतं. पण त्यांनी तसं केलं नाही. ते फक्त माध्यमातच बोलत आहेत. पण त्यांची तक्रार आलेली नसतानाही. बातम्यांतील त्यांचा सूर लक्षात घेता. ही बैठक बोलवण्याची सूचना मी शिस्तपालन समितीला केली. आज तशी बैठक होत आहे, असं राजू शेट्टी यांनी सांगितलं.
तर रविकांत तुपकर यांनीही या सगळ्यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. मी या पक्षात जाणार त्या पक्षात जाणार या केवळ अफवा आहेत. मला संघटनेत राहूनच काम करायचं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे आहेत. शेतकऱ्यांसाठी लढायचं आहे. माझ्यासाठी शेतकरी हा माझा आत्मा आहे. शेतकरी हा माझा प्राण आहे. त्यामुळे मी त्यांच्याचसाठी काम करत राहणार, असं रविकांत तुपकर यांनी म्हटलं आहे.