
नवी दिल्ली : राष्ट्रवादी कुणाची या मुद्द्यावर निवडणूक आयोगात सुरू असलेली आजची सुनावणी संपली आहे. या पुढची सुनावणी ही 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे. राष्ट्रवादीत आतापर्यंत लोकशाही मार्गाने काम होत नव्हतं, शरद पवार आपले घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवतात असा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आला. ज्या लोकांची शरद पवारांनी नियुक्ती केली त्याच पवारांनी त्यांची नियुक्ती कशी काय केली असा प्रश्नही अजित पवारांकडून उपस्थित करण्यात आला. तसेच सर्वाधिक आमदारांची संख्या आपल्यामागे असल्याचं सांगत पक्षही आपलाच असल्याचं अजित पवार गटाने युक्तिवाद केला.
सर्वाधिक आमदार आमच्यामागे, अजित पवार गटाचा दावा
राष्ट्रवादीतील सर्वाधिक आमदार आपल्यामागे असल्याचा दावा आज अजित पवार गटाकडून करण्यात आला. त्याआधारे पक्षाचे चिन्ह आपल्यालाच मिळावं अशी मागणीही केली. अजित पवार गटाकडून सादिक अली आणि पीए संगमा केसचा दाखला देण्यात आला.
सादिक अली केसमध्ये आमदारांच्या संख्येला महत्व देण्यात आलं होतं तर पीए संगमा प्रकरणी सर्वाधिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांची संख्या निर्णय देताना महत्त्वाची समजली होती.
शरद पवार मनमर्जी कारभार करतात, अजित पवार गटाचा दावा
शरद पवार हे आपल्या मर्जीप्रमाणे कारभार करतात, आपले घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवतात असा आक्षेप अजित पवार गटाकडून करण्यात आला. त्यामुळे पक्षांतर्गत लोकशाही नसल्याचा आरोपही करण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta