मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 23 जागांची मागणी केली होती. उद्धव ठाकरेंची ही मागणी काँग्रेस नेत्यांनी फेटाळून लावली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेने खूप जागा जिंकल्या होत्या, पण त्यांचे अनेक उमेदवार एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यात आहेत.
शिवसेनेने मागणी केलेल्या 23 लोकसभा जागा, काँग्रेस पक्षाने नाकारल्या आहेत. काँग्रेस नेत्यांच्या मते, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत बंड झाला आहे. त्यांच्याकडून अनेक नेते सत्तेत गेले आहेत. त्यामुळे काँग्रेस सगळ्यात जुना पक्ष आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले की, इंडिया आघाडीमधील पक्षामध्ये एकी असणं गरजेचं आहे. प्रत्येक पक्षाला जास्तीत जास्त जागा हव्यात. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाची 23 जागांची मागणी खूप जास्त होतेय.
पृथ्वीराज चव्हाण यांनीही दिली प्रतिक्रिया
लोकसभा निवडणुकीच्या जागांच्या अनुषंगाने उद्या (शुक्रवार) अकरा वाजता महाराष्ट्रातल्या नेत्यांची वरिष्ठांसोबत दिल्लीमध्ये बैठक पार पडणार आहे. या बैठकीत काँग्रेस नेमक्या कोणत्या जागा लढणार आहे, याबाबत चर्चा होणार आहे. शुक्रवारी दोन बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. आमच्या बैठकीनंतर महाविकास आघाडीची जी समन्वय समिती तयार करण्यात आली होती, त्यातल्या सदस्यांसोबत देखील दिल्लीमध्ये बैठक पार पडेल. या बैठकीमध्ये जागांच्या संदर्भात चर्चा होईल. सध्या तरी कोणी कितीही जागांबाबत दावे करत असले तरी भाजपला रोखायचं असेल तर सर्वांनी एकत्रितरीत्या येऊन लढाई लढायला हवी, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
जागांची मागणी करताना काळजी घ्या – संजय निरुपम
संजय राऊत 23 जागांची लिस्ट घेऊन आमच्या काँग्रेसच्या वरिष्ठांकडे गेले आहेत. ते जर एवढ्या जागा लढवणार असतील तर आम्ही काय करायचं? असा सवाल संजय निरुपम यांनी उपस्थित केलाय. वंचित बहुजन आघाडीने बारा जागांचे प्रपोजल दिलं आहे, अशा पद्धतीची बातमी मीडियामध्ये पाहिली. एवढ्या जागा ते घेणार असतील तर बाकीच्यांना काय करावे? हा माझा प्रश्न आहे? इंडिया आघाडीमध्ये तुम्ही येत आहात, मात्र जागांची मागणी करताना काळजी घ्या, असेही निरिपम म्हणाले.
जागा वाटपामध्ये सगळ्यांनी कॉम्प्रोमाइज करायला हवं. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघासाठी कुठल्याही प्रकारे काँग्रेस कॉम्प्रमाईज करणार नाही. कोणतेही परिस्थितीत ही जागा काँग्रेस लढेल, असा निर्धारही यावेळी संजय निरुपम यांनी केला.