मुंबई : मराठा आरक्षणाच्या बाबतीत मोठी बातमी समोर येत असून, अखेर मनोज जरांगेंनी ‘मराठा आरक्षणा’ची लढाई जिंकली आहे. सगेसोयरेसह मनोज जरांगे यांच्या प्रमुख तीनही मागण्या मान्य झाल्या असून, काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जूस पिऊन मनोज जरांगे आपलं आमरण उपोषण मागे घेणार आहेत. विशेष म्हणजे सगेसोयरे बाबतचा अध्यादेश आजपासूनच लागू होणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली आहे. रात्री उशिरा सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली आणि त्यानंतर हा निर्णय झाला आहे.
दरम्यान रात्री उशिरा पत्रकार परिषद घेऊन बोलतांना जरांगे म्हणाले आहे की, “आपल्या लढयानुसार 57 लाख नोंदी सापडल्या. त्यांना लवकर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 57 लाखपैकी 37 लाख प्रमाणपत्र वाटले असून, त्याचा डाटा लवकरच आपल्याला मिळणार आहे. सगेसोयऱ्याचा अध्यादेश पारित करण्यात आला आहे. याचा सर्वात मोठा फायदा झाला आहे. सरकराने दिलेल्या राजपत्रावर आपल्या वरिष्ठ वकिलांची तीन तास चर्चा झाली. हायकोर्टाच्या वकीलांनी याची पु्र्ण तपासणी केली आहे. आपली लढाई यासाठी होती आणि ती आता पूर्ण झाली आहे. सोबतच आंतरवाली सराटीसह राज्यातील मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेतले जाणार आहे.
ओबीसीच्या सर्व शैक्षणिक सुविधा
सोबतच कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात येणार आहे. वंशावळी जोडण्यासाठी तालुका स्थरावर समिती नेमण्यात येणार आहे. मराठवाड्यातील कुणबी नोंदी तपासले जाणार आहे. ओबीसी बाबत असलेल्या सर्व शैक्षणिक सुविधा मराठा मुलांना मिळणार आहे.
मुख्यमंत्र्यांचा विरोध संपला…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे. आपला त्यांना विरोध संपला आहे. आपली मागणी मान्य झाली आहे. आपल्याला विरोध करणाऱ्यांना आपण विरोध होता. समाज म्हणून आपला विषय संपला आहे. मी मुख्यमंत्री यांच्या हस्ते जूस स्वीकारणार आहे. आपण त्यांच्या हस्ते पत्र स्वीकारणार आहोत. समाजाला मी मायबाप मानले आहे. मी तुम्हाला विचारून निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांना बोलवू का? यावर सर्वांनी होकार दिल्याने मी निर्णय घेतला आहे. सर्व खुट्या मी उपटल्या आहेत. मला विजयी सभा प्रचंड मोठी घ्यायची आहे. ती तारीख लवकर घोषित करणार, असल्याचे जरांगे म्हणाले.