मुंबई : हिंदुस्थानातील खुल्या वर्गातील जनतेवर अन्याय होणार नाही, ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात लवकरात लवकर आम्ही न्यायालयाचं दार ठोठावू, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत. ज्यांनी या आरक्षणामध्ये पाणी टाकण्याचं काम केलं, मराठा जनेतेनं कायद्याचं वाचन करावं, हे आरक्षण टिकणारं नाही, असा सल्लाही यावेळी बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे.
मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावर बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, “देशातील महाराष्ट्रात माझ्यावर अशी जबाबदारी आहे की, खुल्या वर्गातील ब्राम्हण, वैश्य, जैन, मागासवर्गीयांमधील गुणवंत असतील यांच्या अधिकाऱ्यांच्या जागा शाबुत ठेवणं, त्यावर गदा येऊ न देणं, त्यासोबतच खऱ्या मागासवर्गीय जाती आहेत, त्यांची गुणवत्ता एका विशिष्ट स्तरावर आणणं, याची जबाबदारी आमच्यावर आहे.”
संजय राऊतांनी माझ्या मराठा भावांना भरीस घातलं : गुणरत्न सदावर्ते
“खुल्या वर्गातील गुणवंतांच्या जागा सुरक्षित राहिल्या पाहिजेत. मागास वर्गातील कष्टकरी आहेत, त्यांनाही न्याय मिळायला हवा. मात्र, आज दिलीय ती नोटीस आहे. आम्ही लवकरच न्यायालयात जाणार, संजय राऊतांनी माझ्या मराठा भावांना भरीस घातलं, मराठा बांधवांनी कायद्याचं वाचन करावं आणि कलमं बघावीत.”, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत.
कायद्यानुसार आरक्षण टिकू शकत नाही : गुणरत्न सदावर्ते
“सगेसोय यांबाबत जे बोललं गेलं, ते आधीपासून कायद्यात अंतर्भूत आहेत. कुणीही या गोष्टीला विजयोत्सव वगौरे म्हणू नये, जरांगेंकडून ही दिशाभूल केली जाणारी बाब. वेगवेगळे स्टंट केले जातात, त्यांपैकी हा एक पॉलिटीकल स्टंट. कायद्यात हे प्रकरण टिकू शकत नाही, डंके की चोट पर… कोणतीही बॅक डोअर एन्ट्री हा प्रकार कायद्याच्या संहितेत नाही, अशी तरतुद कायद्यात नाही. कुणबींना मागास कुणबी नाही, हे स्पष्टपणे सांगितलं गेलं आहे. आजच्या प्रकारच्या नोटिसेस दिल्या जाऊ शकतात, मात्र कायद्यानुसार आरक्षण टिकू शकत नाही.”, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत.