मुंबई : राज्यात महायुतीकडून अब की बार 45 पार असा नारा देत असला तरी परिस्थिती चिंताजनक असल्याचे चित्र आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर मूड ऑफ द नेशन सर्वेक्षणात महाराष्ट्रातील धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. सर्वेक्षणात महाविकास आघाडीने भाजप-शिंदे-अजित पवार गटावर मात केल्याचे दिसत असून विरोधी आघाडीला 48 पैकी 26 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भाजप महायुतीला 40.5 टक्के मते, तर काँग्रेस आघाडीला 44.5 टक्के मते मिळत असल्याचे दिसत आहे.
सर्वेक्षणानुसार, आज भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांची युती एकत्र निवडणूक लढवल्यास त्यांना 40.5 टक्के मते मिळतील.
कोणत्या पक्षाला किती जागा?
मूड ऑफ द नेशन सर्वेक्षणा लोकसभेला महाराष्ट्रात 48 पैकी भाजपला 22 जागा, काँग्रेसला 12 जागा, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) 14 जागा मिळतात. शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट) यांना 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्र येऊन भाजपला विशेष फायदा होताना दिसत नाही. भाजप महायुतीला 40.5 टक्के, काँग्रेसच्या महाविकास आघाडीला 44.5 टक्के तर इतरांना 15 टक्के मते मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आम्ही 35 जागा जिंकणार; संजय राऊतांचा दावा
या सर्वेक्षणावर शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडी एकत्रितपणे 48 पैकी 35 जागा जिंकणार आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत निवडणूक लढवणार आहोत. आपण सर्वांनी मिळून 30-35 जागांच्या पुढे जायचं आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना एकत्र लढले होते. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांपैकी भाजपने 23 आणि शिवसेनेने 18 जागा जिंकल्या होत्या. भाजपला 28 टक्के तर शिवसेनेला 23 टक्के मते मिळाली. एकूण 51 टक्के मतांसह एनडीएने येथे 41 जागा जिंकल्या होत्या. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर 12 जागा शिंदे गटाकडे तर 6 जागा उद्धव ठाकरे गटाकडे आहेत.