पुणे : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांच्या गाडीच्या काचा फोडल्या आहेत. तसेच त्यांच्या गाडीवर शाईफेक देखील करण्यात आली आहे. संबंधित प्रकरामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड सुरु आहे. निखिल वागळे यांच्याकडून पुण्यातील राष्ट्रसेवा दलाच्या सभागृहात ‘निर्भय बनो’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केला. विशेष म्हणजे भाजप कार्यकर्ते हा कार्यक्रम उधळून लावण्याच्या प्रयत्नातही होते. भाजप कार्यकर्ते सभागृहात जाऊन बसले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांची समजूत काढली होती. तर कार्यकर्त्यांनी आपण विचार ऐकायला आलो असल्याचा निर्वाळा दिला होता. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर निदर्शने दिली होती. या सगळ्या प्रकारानंतर आता भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
पुण्यातल्या खंडोजी बाबा चौकात निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर आता महाविकास आघाडीचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. महाविकास आघाडीच्या तरुण कार्यकर्त्यांनी या हल्ल्याच्या विरोधात आंदोलन पुकारलं आहे. हल्ला करणाऱ्यांनी निखिल वागळे यांच्या समर्थकांवर अंडे फेकल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. हल्ला झाला तेव्हा निखिल वागळे, वकील असीम सरोदे हे गाडीतच होते. ते त्याच गाडीने कार्यक्रमस्थळी आले आणि सभेला उपस्थित राहीले. भाजपच्या आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या आंदोलकांनी केला आहे.
निखिल वागळे यांच्या आंदोलनस्थळी आता पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार घडणार नाही, याची खबरदारी पोलिसांकडून घेण्यात येत आहे. तसेच ज्या गाडीवर हल्ला झाला ती गाडी आता घटनास्थळावरुन दुसरीकडे पाठवण्यात आली आहे. “भारतात लोकशाही राहिलेली नाही”, असा आरोप निखिल वागळे यांच्याकडून करण्यात येतो. त्यांच्याकडून सातत्याने मोदी सरकारवर टीका केली जाते. त्यामुळे त्यांची सभा उधळून लावण्याचा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिला होता. त्यानंतर सभेच्यावेळी सभागृहाबाहेर मोठा राडा होताना बघायला मिळाला.
‘पोलिसांना कडक कारवाई करायला सांगणार’, अजित पवारांची प्रतिक्रिया
पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या घटेनवर प्रतिक्रिया दिली आहे. “आताच हा प्रकार झाल्याचं मला समजलं, मी तिथल्या पोलीस आयुक्तांशी लगेच बोलणार आणि कडक कारवाई करायला सांगणार आहे. जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.