Monday , April 14 2025
Breaking News

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, मराठा संघटना आक्रमक; बारामती, आळंदीत कडकडीत बंद

Spread the love

 

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करण्याची ही चौथी वेळ आहे. मनोज जरांगे यांनी रविवारी उपोषणाला सुरुवात केली होती. त्यांनी अन्न, पाणी घेण्यास नकार दिला आहे. तसेच कोणतेही वैद्यकीय उपचारही मनोज जरांगे यांनी नाकारले आहेत. त्यामुळे गेल्या चार दिवसांमध्ये मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने मनोज जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्त्राव होण्यास सुरुवात झाली आहे. आज सकाळी मनोज जरांगे नाकातून येणारे रक्त रुमालाने टिपताना दिसून आले. त्यांची प्रकृती खालावल्याने मराठा संघटना कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी राज्याच्या विविध भागात बंद पुकारला आहे.

सध्याच्या माहितीनुसार, मराठा संघटनांकडून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर आंदोलनं केली जात आहेत. याचाच भाग म्हणून मराठा समाजाने पुण्यातील देवाची आळंदी बंदची हाक दिली. त्याला आळंदीकरांनी प्रतिसाद दिलाय. वारकऱ्यांची मांदियाळी असणारी अलंकापुरी आज ओस पडलेली आहे. तर सोलापूर, मनमाड, बीड, बारामती येथेही मराठा संघटनांनी पुकारलेल्या बंदचे पडसाद दिसत आहेत. या जिल्ह्यांमधील शहरी भागात बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर ग्रामीण भागात बंदला मिळणारा प्रतिसाद संमिश्र आहे.

मराठा क्रांती मोर्चाकडून बारामती शहर व बारामती तालुक्यात बंद पाळण्यात आलाय. शहरात आज आठवडे बाजार असल्याने व्यापारी महासंघाच्या वतीने दुपारपर्यंत या बंदला पाठिंबा देण्यात येणार असून दुपारनंतर व्यवसायधारकांनी आपली दुकानी उघडावीत, असे आवाहन व्यापारी महासंघाने केलं आहे. तसेच इंदापूर, दौंड, पुरंदरमध्ये देखील बंदला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आज उत्तर सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा समाज बांधवाकडून सोलापुरातील कोंडी गावात ही बंद पुकारला आहे. गावात सकाळपासून सर्व दुकाने बंद, केवळ दुध आणि अत्यावश्यक सेवा सुरु आहे. सरकारने दिलेला शब्द पाळत आरक्षणाची अंमलबजावणी करावी, मराठा बांधवाची भूमिका आहे.

मनोज जरांगे यांच्यासाठी वैद्यकीय पथक

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. त्यांची प्रकृती वेगाने ढासळत असल्याने सोमवारी रात्री जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी मनोज जरांगे पाटील यांना पाणी पिण्याची विनंती केली. मात्र, जरांगे पाटील यांनी नकार दिला. सध्या अंतरवाली सराटी येथे वैद्यकीय तज्ज्ञांचे एक पथक हजर आहे. परंतु, मनोज जरांगे पाटील वैद्यकीय तपासणीकडून पाहणी किंवा उपचार करुन घेण्यास तयार नाहीत.

About Belgaum Varta

Check Also

दुकाने अधिकृत मार्केटमध्ये हलवावीत; स्थानिकांचा आग्रह

Spread the love  प्रशासन लवकर पावले उचलणार का? – नागरिकांचे लक्ष लातूर (उदगीर) (अविनाश देवकते) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *