मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, राजकीय बैठकांचा जोर वाढला आहे. महाविकास आघाडीच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असून, आज, गुरुवारच्या बैठकीत जागावाटप सूत्रावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन महायुतीत सहभागाचे स्पष्ट संकेत दिलेल्या राज ठाकरे यांच्या मनसेचीही आज बैठक होणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या शनिवारी लोकसभा निवडणुकांच्या वेळापत्रकाची घोषणा केली. मात्र, अद्याप महाविकास आघाडीसह महायुतीचे जागावाटप निश्चित झालेले नाही. त्यामुळे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांची दिल्लीवारी सुरू असून, जागावाटपाचे सूत्र निश्चित करण्यासाठी सर्वांची लगीनघाई सुरू आहे. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकरच महायुतीत सामील होणार असल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असल्याने आता महायुतीच्या जागावाटपाबरोबरच महाविकास आघाडीच्या जागावाटपाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांकडून जागावाटपाबाबत कोणत्याही प्रकारचे हेवेदावे नसल्याचा दावा केला जात असला तरी रखडलेल्या जागावाटपामागे बहुतांश पक्षनेते व कार्यकर्ते यांचे समाधान न होणे, हेच प्रमुख कारण आहे. आता महाविकास आघाडीने जागावाटप अंतिम करण्यासाठी आज, २१ मार्चचा मुहूर्त निवडला आहे. या बैठकीत अंतिम चर्चा केली जाणार असून, त्यानंतर जागावाटप जाहीर केले जाणार आहे. त्यामुळेच या जागावाटपात वंचित बहुजन आघाडीला किती जागा देण्यात येतात, याबाबतही तर्कविर्तक लढवले जात आहेत. या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार, काँग्रेसचे नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जाते.