मुंबई : मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात भाजपने बडा चेहरा मैदानात उतरवला आहे. ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपने तिकीट जाहीर केलं आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध उज्वल निकम अशी लढत होणार आहे. दुसरीकडे भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून भाजपने या जागेवरील उमेदवारी राखून ठेवली होती. विद्यमान खासदार पूनम महाजन यांना तिकीट दिलं नव्हतं, त्यामुळे त्यांचा पत्ता कट होणार हे निश्चित होतं. मात्र अनेक दिवसांपासून या जागेवर भाजप कोणाला उमेदवारी देणार याबाबतची उत्सुकता होती. अखेर भाजपने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. पूनम महाजन यांना मतदार संघात होत असलेला विरोध यामुळे भाजपनं नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. उज्ज्वल निकम हे सरकारी वकील आहेत. अनेक खटल्यांमध्ये त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. दहशतवादी कसाबविरुद्ध खटल्यात त्यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिलं आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta