पुणे : गोवामुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, सीमालढा याचबरोबर मुंबईतील श्रमजीवी जनतेच्या लढ्यात अग्रभागी राहून लढलेल्या नेत्या पद्मश्री कॉ. प्रेमा पुरव यांचे मंगळवार दि. २ जुलै रोजी पहाटे निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात डॉ. मेधा सामंत पुरव, विशाखा पुरंदरे व माधवी कोलंकारी या तीन कन्या, जावई, नातवंडे असा परिवार आहे. दुपारी त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
प्रेमा पुरव या मूळच्या प्रेमा तेंडूलकर. त्या गोव्यातील सत्तरी तालुक्यातील वेळगे या गावच्या. त्यांचे संपूर्ण कुटुंबच गोवामुक्ती संग्रामात सहभागी झाले होते. त्यांच्यावर जेव्हा पोर्तुगीज पोलिसांनी पकड वारंट बजावले तेव्हा त्या आपला भाऊ काशीनाथ यांच्यासह खानापूर तालुक्यात आल्या. तेथून पुढे त्या बेळगावला कॉ. कृष्णा मेणसे यांच्या संपर्कात आल्या. कारण तेही गोवामुक्ती संग्रामात सहभागी होते. बेळगावातून पुढे त्या मुंबईस आल्या व आचार्य अत्रे यांच्या कार्यालयात काम करू लागल्या. त्याच काळात सुरू झालेल्या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात त्यांनी भाग घेऊन सत्याग्रह केला. त्यांना अटकही झाली. पुढे सीमा लढ्यातही त्यांनी भाग घेतला. मोर्चाच्या अग्रभागी असताना त्यांच्यावर लाठीमार झाला होता.
मुंबईतील गिरणगावात गिरणी कामगारांना डबे देणाऱ्या महिलांची त्यांनी अन्नपूर्णा महिला मंडळ या नावाने संघटना उभारली आणि या संघटनेच्यावतीने या महिलांमध्ये त्यांनी दीर्घकाळ काम केले. त्याच काळात सुरू झालेल्या महागाई प्रतिकार कृती समितीच्या चळवळीत त्या मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर, तारा रेड्डी यांच्यासोबत अग्रभागी राहिल्या. त्यांचे विधायक काम बघता बघता वाढले आणि मुंबईबरोबरच वाशी, बेळगाव, पुणे अशा भागात ते पसरले. बेळगावात १९९५ साली त्यांनी अन्नपूर्णा महिला मंडळाची शाखा सुरू केली. बेळगावातील कार्यकर्त्यांना त्यांचे नियमितपणे मार्गदर्शन लाभत असे. त्यांना त्यांच्या विधायक कामासाठी २००२ साली पद्मश्री हा मानाचा नागरी किताब देऊन गौरविण्यात आले होते.
इतरही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ३३ पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांचा दुर्गाबाई देशमुख पुरस्कार देऊन गौरव केला होता.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या त्या सदस्य होत्या व अखेरपर्यंत त्या सदस्य म्हणून वावरल्या. त्यांची पक्षनिष्ठा वादातीत होती. पक्ष कार्यकर्त्यांनी चळवळीबरोबरच विधायक कामेही करावयास हवीत या मताचा त्या नेहमी आग्रह धरीत असत.