नवी मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांवर काळाने झडप घातली. मुंबईहून पु्ण्याकडे निघालेल्या खासगी बसचा पनवेलजवळ सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. बससमोर अचानक ट्रॅक्टर आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच बस ट्रॅक्टरला धडकून २० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
अपघातानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. बसमधील जखमी प्रवाशांना उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
यापैकी ७ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे. अपघातातील मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाही. मात्र, बसमधील प्रवासी डोंबिवली येथील रहिवासी असल्याचं सांगितलं जातंय. नवी मुंबई पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त खासगी बसला बाहेर काढले.
मदतकार्य पूर्ण झाल्यावर पुण्याकडे जाणारी लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आषाढी एकादशीनिमित्त डोंबिवली येथील ५४ प्रवाशांना घेऊन एक खासगी बस मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. सोमवारी रात्री बस पनवेल हद्दीत आली असता, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अचानक बससमोर एक ट्रॅक्टर आला. त्यामुळे बसचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच बस ट्रॅक्टरला धडकून २० फूट खोल दरीत जाऊन कोसळली. अपघात इतका भीषण होता, की दोन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. या घटनेत ५ प्रवासी जागीच ठार झाले. तर ४२ प्रवासी जखमी झाले. मृत्तांमध्ये बसमधील तिघे आणि ट्रॅक्टर वरील दोघांचा समावेश आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.