Friday , October 18 2024
Breaking News

ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन

Spread the love

 

 

मुंबई : साहित्यिक, पर्यावरणवादी चळवळीतील लढवय्ये कार्यकर्ते असलेले फादर फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. मागील काही वर्षांपासून ते आजारी होते. वसईत त्यांनी आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे धाराशीव (उस्मानाबाद) येथे पार पडलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वासोबत पर्यावरण चळवळीवर शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज दुपारी 3.30 वाजेपर्यंत त्यांच्या राहत्या घरी (जेलाडी) येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 4 वाजल्यापासून नंदाखाल येथील होली स्पिरिट चर्च येथे अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यांचा अंत्यविधी मिस्सा हा आजच गुरुवारी 25 जुलै 2024 सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास होली स्पिरिट चर्चमध्ये होणार आहे.

फ्रान्सिस दिब्रिटो यांचं शिक्षण नंदाखाल येथील संत जोसेफ मराठी हायस्कूलमध्ये झालं. 1972 साली त्यांनी कॅथलिक धर्मगुरुपदाची दीक्षा घेतली. त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बी.ए., तर धर्मशास्त्रात एम.ए. केलं. फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मगुरू असले तरी त्यांची खरी ओळख ही पर्यावरणप्रेमी, पर्यावरणाचे रक्षणकर्ते, गुंडशाहीविरोधात आवाज उठवणारे कार्यकर्ते अशीच राहिली आहे. पालघर जिल्ह्यातील वसई तालुका आणि जवळपासच्या परिसरात त्यांनी सातत्याने पर्यावरणाच्या बाजूने भूमिका घेतली. ‘सुवार्ता’ या मासिकाद्वारे त्यांनी सामाजिक प्रबोधनाचे अनेक वेगवेगळे विषय मांडले आणि काही उपक्रमही राबवले. त्यामुळे हे मासिक केवळ ख्रिस्तीधर्मीयांसाठी न राहता मराठी साहित्यातही या मासिकाचा स्वतंत्र ठसा उमटला. फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे 1983 ते 2007 या दरम्यानच्या काळात ‘सुवार्ता’चे मुख्य संपादक होते.

‘हरित वसई संरक्षण समिती’च्या माध्यमातून फ्रान्सिस दिब्रिटो यांनी पर्यावरण संरक्षण, जतन आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली होती. वसईतील ‘राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण’ यांच्या विरोधातही त्यांनी पुढाकार घेतला आणि मोठी मोहीम राबविली.

About Belgaum Varta

Check Also

“प्रेयसी एक आठवण” या सत्य प्रेम स्वरूप कादंबरीवर आधारित निघणार चित्रपट..

Spread the love  ठाणे : ” प्रेयसी एक आठवण ” ही सत्य प्रेम स्वरूप कादंबरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *