रायगड : शेतकरी कामगार पक्षाने अलिबाग, पनवेल, उरण, पेण मतदारसंघातून उमेदवार जाहीर केल्याची माहिती मिळाली आहे. या चारही मतदारसंघात पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी उमेदवारीची घोषणा केली आहे. शेकापने अलिबागमध्ये मेळाव्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करत चार उमेदवारांची घोषणा केली. शेतकरी कामगार पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांचे मोठं शक्तिपर्दशन केल्याचे दिसून आले. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात महिलांची संख्या पाहायला मिळाली.
दरम्यान, शेतकरी कामगार पक्षाने रायगड जिल्ह्यातील ४ उमेदवार जाहीर केले आहेत. तर सोलापुरातील सांगोला विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी उद्या चर्चा करून पक्षातील वरिष्ठ नेते उमेदवार ठरवणार असल्याची माहिती हाती आली आहे. सांगोल्यात शेकापकडून बाबासाहेब देशमुख इच्छुक आहेत.
शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीतील पक्ष आहे. २०१९ साली विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांनी शेकापच्या पंडित पाटील उर्फ सुभाष पाटील यांचा पराभव केला होता. तर शेकापच्या बालेकिल्ल्यात शेकापकडे प्रतिनिधित्व नसल्याने २०१९ साली झालेला पराभव शेकाप कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला होता. त्यानंतर आता शेकापच्या बालेकिल्ल्यात चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
शेकापचे रायगडमधील उमेदवार
1) अलिबाग – चित्रलेखा पाटील
2) पनवेल – बाळाराम पाटील
3) उरण – प्रितम पाटील
4) पेण – अतुल म्हात्रे