नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाला घड्याळाऐवजी दुसरे चिन्ह देण्यात यावे, अशी मागणी शरद पवार गटाने केली होती. हे प्रकरण आज (मंगळवारी) सर्वोच्च न्यायालयाच्या संभाव्य यादीत होते. मात्र मुख्य यादीत हे प्रकरण येऊ शकले नाही. त्यानंतर शरद पवार गटाच्या वतीने हे प्रकरण न्यायालयासमोर नमूद करण्यात आले आहे. मात्र विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, आमच्या काही उमेदवारांनी एबी फॉर्मसह अर्जही दाखल केले आहेत, असे म्हणत अजित पवार गटाच्या वतीने विरोध करण्यात आला आहे.
पुढील सुनावणी १२ नोव्हेंबर रोजी
दरम्यान, शरद पवार गट नव्या चिन्हासाठी आणि नावासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करू शकतो. त्यानुसार शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे अर्ज केला. निवडणूक आयोगाने त्यांना ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ हे नाव आणि ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह देण्यात आले. पुढे लोकसभा निवडणुकीदरम्यान अजित पवार गट घड्याळ चिन्ह वापरत असताना त्याखाली ‘हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे’ असे लिहिण्यासही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह या मुख्य प्रकरणाच्या सुनावणीसाठी १२ नोव्हेंबर ही तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारी शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी एक अर्ज नमूद करून घेतला.