मुंबई : मुंबईत आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. विधानभवनातील भाजप विधिमंडळ पक्ष कार्यालयात भाजपची कोअर कमिटीची बैठक झाली.
भाजपचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव निश्चित करण्यात आले आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या नावावर एकमत झालं. त्यानंतर आता विधिमंडळ पक्ष बैठकीत संमत होण्याची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. या बैठकीत निरीक्षक म्हणून इथे आलेले विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन देखील उपस्थित होते.
आता भाजप विधिमंडळ पक्षनेत्याची बैठक होणार
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर आता भाजप विधिमंडळ पक्षनेत्याची बैठक होणार आहे. या बैठकीत रणधीर सावरकर हे गटनेता निवड बैठकीत संचलन करतील. तर सुधीर मुनगंटीवार व चंद्रकांत पाटील हे प्रस्ताव मांडतील. रविंद्र चव्हाण हे प्रस्तावाला अनुमोदन देतील, अशी माहिती समोर आली आहे.
उद्या फक्त मुख्यमंत्री अन् दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार?
उद्या (5 नोव्हेंबर) आझाद मैदानात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे तीन लोकच शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची महायुतीच्या सूत्रांची माहिती आहे. घटकपक्षांना मंत्र्यांच्या जागांचा फॉर्म्युला निश्चित झाल्यावरच इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. दरम्यान, आज महायुतीकडून सरकार स्थापनेचा दावा करण्यात येणार आहे. दुपारी साडेतीन वाजता महायुतीचे नेते राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना भेटून, तिन्ही नेते सरकार स्थापनेचं पत्र राज्यपालांकडे सोपवणार आहेत.
उद्धव ठाकरेंनाही शपथविधीसाठी निमंत्रण
नव्या सरकारच्या शपथविधीसाठी अनेक राज्यासह देशभरातील दिग्गज नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. यात राज्यातील नेत्यांमध्ये उद्धव ठाकरेंसह अनेक महत्त्वाच्या नेत्यांना बोलवण्यात आलंय. तर भाजपशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील शपथविधीचं निमंत्रण दिलंय…योगी आदित्यनाथ, नितीशकुमार, प्रमोद सावंत, भूपेंद्र पटेलांसह अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा यात समावेश आहे.
Belgaum Varta Belgaum Varta