
मुंबई : सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. अभिनेत्याच्या घरी सापडलेल्या फिंगरप्रिंट्स बांगलादेशी शरीफुल इस्लाम शहजादच्या फिंगरप्रिंटशी जुळत नाहीत, असा खळबळजनक खुलासा झाल्याचं बोललं जात आहे. सैफ अली खानवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली शरीफुलला 16 जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. मिड-डेच्या वृत्तानुसार, सीआयडीनं तपास केला होता, ज्यानं शरीफुलच्या फिंगरप्रिंट जुळत नसल्याचं अहवालात नमूद केलं होतं. अशातच आता सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे की, चुकीच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेनं सुमारे 40 पथकांना नियुक्त केलेल्या 3 दिवसांच्या मोठ्या शोध मोहिमेनंतर सैफला त्याच्या घरात घुसून भोसकणारा आरोपी शरीफुलला ठाण्यातून अटक करण्यात आली. मिडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याच्या घरातून एकूण 19 बोटांचे नमुने घेण्यात आले आणि त्यापैकी एकही शरीफुलशी जुळत नसल्याचं समोर आलं. या घटनेमुळे सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीच्या अटकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. मुंबईतील लीलावती रुग्णालयात सैफ अली खानवर सहा तासांची शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच, शस्त्रक्रिया करुन सैफच्या मणक्याजवळ रुतलेला चाकूचा अडीच इंचाचा तुकडा काढण्यात आला अशी माहिती लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे.

चुकीच्या माणसाला अटक
सोशल मीडियावर आधीच सैफ अली खान प्रकरणावरुन अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. अशातच आता सैफ अली खानच्या इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पॉट झालेला व्यक्ती आणि अटक करण्यात आलेली व्यक्ती दोन्ही वेगवेगळ्या असल्याचं समोर आलं आहे. शरीफुलच्या बोटांच्या ठशांचा सीआयडी अहवाल आला आहे आणि तो सीआयडीच्या फिंगरप्रिंट ब्युरोकडे पाठवण्यात आला आहे. अशातच सिस्टम-जनरेटेड रिपोर्टद्वारे खुलासा झाला आहे की, सैफच्या घरातून घेण्यात आलेले 19 बोटांचे ठसे शरीफुलशी जुळत नव्हते. मिड-डेनं सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलं की, शुक्रवारी पुण्यातील सीआयडी अधीक्षकांना हा अहवाल पाठवण्यात आला.

Belgaum Varta Belgaum Varta