नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी सावनेर येथील कार्यक्रमानंतर नागपुरात थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे घर गाठून सुमारे पाऊणतास चर्चा केली. यामुळे राजकीय चर्चांनी नवे ’वळसे’ घेतले आहे. तसेच नितीन गडकरी हेच राष्ट्रवादी आणि भाजपातील संवादाचा नवा फ्लायओव्हर असल्याचे संकेत मिळत आहेत. ही चर्चा बंदद्वार होती. त्यातील तपशील बाहेर येऊ शकला नसला तरी आशिष शेलार यांचे वक्तव्य तसेच राज्यातील सध्यपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याने या भेटीला वेगळे महत्व आले आहे.
भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीचे संयुक्त सरकार स्थापन करण्याचा निर्णय 2017 मध्ये झाला होता. पण, राष्ट्रवादीने शिवसेनेला विरोध केल्यामुळे प्रयोग प्रत्यक्षात येऊ शकला नाही, असा गौप्यस्फोट भाजप नेते आशिष शेलार यांनी केला होता. तेव्हापासून राज्याच्या राजकारणावर अनेक तरंग उठत आहेत. त्यातच राष्ट्रवादीची ऑफर न स्वीकारल्याचा पश्चाताप होतो, असे वक्तव्य माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर या भेटीची चर्चा होत आहे.
नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यातील सख्य सर्वदूर माहीत आहे. 3 मे रोजी शरद पवार यांच्या हस्ते गोसेखुर्दच्या जलपूजन कार्यक्रमात पवार आणि गडकरी सोबत राहणार आहेत. भाजप आणि शिवसेनेतील मतभेद आता कमालीचे टोकाला गेल्याने ते आता एकत्र येण्याची शक्यता नाही. हे लक्षात घेता भविष्यातील सत्तासमीकरणे किती आणि कसे वळसे घेतात यावर बरेच काही अवलंबून आहे. यात नितीन गडकरी हे सर्वमान्य असे नेतृत्व आहे.
’सबका साथ, सबका विकास’ हे गडकरींचे धोरण आहे. भाजपच्या दारी सत्तेचे तोरण गडकरी हेच बांधू शकतात. भविष्यात नवी समीकरणे जुळलीच तर गडकरींच्या मदतीने सत्तेचं उड्डाण सोपे होईल, या हेतूने भेट झाल्याची चर्चा आहे.