
मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार राजन साळवी यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केला. काल साळवी यांनी ठाकरे गटाच्या उपनेतेपदाची राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर लगेचच त्यांनी पक्षप्रवेशासाठी ठाणे गाठले. आज ठाण्याला पोहोचून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. पक्षप्रवेशापूर्वी एकनाथ शिंदे, राजन साळवी आणि सामंत बंधू यांच्यात चर्चा झाली अशी माहिती समोर आली आहे.
ठाण्यामध्ये हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये राजन साळवी यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. त्यांच्या पक्ष प्रवेशापूर्वी आनंद आश्रमामध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे हे पहिल्यापासून माझे गुरु होते. त्यांच्यासोबत मागच्या वेळी जाऊ शकलो नाही. पण जाण्यासाठी निमित्त लागलं. ते निमित्त लागलं, मी या ठिकाणी आलो. शिंदे साहेबांचा आशिर्वादा घेतला असे वक्तव्य केले.
मशाल सोडून हाती धनुष्यबाण घेतल्यानंतर राजन साळवी यांनी पत्रकार परिषद घेतली. या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ठाकरे गट सोडण्याची कारणे देखील सांगितली. ते म्हणाले, ‘मी बाळासाहेब ठाकरे यांचा लाडका शिवसैनिक आहे. त्यांना अभिप्रेत असलेले काम मी आजपर्यंत केले आहे. त्यांच्याच विचाराने मी काम पुढे नेणार आहे. माझ्या पराभवाला जे लोक कारणीभूत आहेत, त्या संबंधित माहिती, पुरावे मी उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केले आहेत’. ‘त्यानंतर मला वाटलं आता थांबावं, पण मतदारसंघातील माणसं, त्यांचा विकास, जिल्ह्याचा विकास यासाठी मी पुन्हा उभं राहिलं पाहिजे असा आग्रह मंडळींनी धरला. एकनाथ शिंदेs यांचे नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारले आहे. त्यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा शिवसेना, धनुष्यबाण घेऊन लोकांंमध्ये जाऊ’, असे विधान राजन साळवी यांनी केले. ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्याशी राजन साळवी यांचा वाद सुरु होता. या वादात उद्धव ठाकरेंनी राऊत यांची बाजू धरल्याने साळवी नाराज झाले होते.

Belgaum Varta Belgaum Varta