नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलून इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना अश्लिल शिवीगाळ, धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला अटक करण्यासाठी नागपुरात दाखल झालेल्या कोल्हापूर पोलिसांना अद्याप त्याचा सुगावा लागलेला नाही. बेलतरोडी पोलीस याकामी त्यांना सहकार्य करीत असले तरी त्यांच्या घरी कोणी नसल्याने त्याच्या नातेवाईक व मित्रांकडेही पोलिसांची शोधाशोध सुरू आहे. त्याचे दोन्ही फोन बंद असून तो मध्यप्रदेशातील इंदूरच्या दिशेने गेल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, पोलिसांनी सायबर पोलिसांच्या मदतीने काढलेल्या सीडीआरच्या प्राथमिक माहितीनुसार नागपुरातूनच सावंत यांना फोन केल्याचे समोर आले आहे.
सकल मराठा समाजाने कारवाईसाठी दिलेले २४ तास उलटले असल्याने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. दुसरीकडे कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता लक्षात घेता कोरटकरची अटकपूर्व जामीनासाठी देखील धडपड सुरू असल्याची माहिती मिळत आहे. कोरटकरला ताब्यात घेण्यासाठी कोल्हापूरचे पोलीस पथक नागपुरात बुधवारी रात्री दाखल झाले. बेलतरोडी पोलीस घराभोवती बंदोबस्त आणि पाळत ठेवून आहेत.
सावंत यांनी या संदर्भातील ऑडिओ क्लिप व्हायरल केल्यानंतर कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात कोरटकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षकाच्या नेतृत्वातील पथक नागपूरात दाखल झाले. प्रशांत कोरटकर याने मात्र धमकी देण्यासाठी ‘एआय’चा वापर करुन माझी बदनामी केली, असा दावा केला. मंगळवारपासूनच कोरटकर घरी नसून कुटुंबीय देखील घर सोडून इतरत्र निघून गेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आदी अनेक भाजपच्या मोठ्या नेत्यांसोबत कोरटकरचे फोटो सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहेत. याप्रकरणी भाजपने निषेधही न केल्याने विरोधकांनी त्यांना लक्ष्य केले आहे. एकंदरीत कोल्हापूर ते नागपूर हे प्रकरण दोन्ही बाजूने तापताना दिसत आहे.