मुंबई : राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. जयकुमार गोरे यांनी पीडित महिलेला विवस्त्र फोटो पाठवले, असा दावा केला जात आहे. जयकुमार गोरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते मानले जातात. त्यांच्यावर अशाप्रकारचे गंभीर आरोप झाल्याने महायुती सरकारमधील कलंकित नेत्यांच्या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. याविषयी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारणा करण्यात आली. यावर बावनकुळे यांनी म्हटले की, मला याबद्दल माहिती नाही. याच्याबद्दल माहिती करुन घेईन आणि सांगेन, असे सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढता पाय घेतला.
जयकुमार गोरे यांच्यावर महिलेने केलेल्या आरोपांचा नेमका तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जयकुमार गोरे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत भाष्य केले. संजय राऊत यांनी म्हटले की, हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यानी कसा छळ आणि विनयभंग केलेला आहे, या संदर्भातली माहिती समोर आली आहे आणि ती महिला, ती अबला पुढल्या काही दिवसांमध्ये विधानभवनासमोर उपोषणाला बसणार आहे, अशी ती बातमी आहे. संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळात आहे, आता हे एक पात्र नवीन निर्माण झालं. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील मंडळातील पत्ते पुन्हा एकदा पिसले पाहिजेत. त्यांनी पुन्हा एकदा सर्व मंत्र्यांची झाडाझडती घेतली पाहिजे. त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व रत्न त्यांनी पुन्हा एकदा तपासली पाहिजेत. जयकुमार गोरे यांच्याबाबत समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. ही गोष्ट गंभीर आहे आणि महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे. हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील स्त्रीचा विनयभंग केला आणि तो मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात असेल तर त्यामुळे महाराष्ट्र कलंकित होतोय, असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, महायुती सरकारने याबाबत योग्य कारवाई न केल्यास 17 मार्चपासून विधान भवनासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा संबंधित महिलेने दिला आहे.