
मुंबई : राज्य सरकारकडून त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही निर्णय मागे घेण्यात आले आहेत. त्यानंतर आता पाच जुलै रोजी निघणारा मोर्चा देखील रद्द करण्यात आला आहे. याबाबत संजय राऊत यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. राज्यात हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं. पहिली पासून हिंदी सक्ती नको अशी भूमिका राज्यातील अनेक संघटना आणि पक्षांनी घेतली होती. याच पार्श्वभूमीवर येत्या पाच जुलैला मोर्चा निघणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.
या मोर्चाला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे दोन्ही ठाकरे बंधू उपस्थित राहणार होते. मात्र त्यापूर्वीच आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने त्रिभाषा सूत्र लागू करण्याबाबतचे दोन्ही निर्णय रद्द केले आहेत. त्यानंतर आता डाॅक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. समितीचा अहवाल आल्यावर त्रिभाषा सुत्र लागू होणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेनंतर पाच जुलै रोजीचा मोर्चा देखील रद्द करण्यात आला आहे. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta