
नवी दिल्ली : ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असतानाच दोन वर्षानंतर पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावर सुनावणी होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून आज सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेपाची याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाकडून याबाबतची सुनावणी १४ जुलै रोजी निश्चित करण्यात आली. ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेल्या याचिकेत निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देऊन त्यांना ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह देण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे.
न्यायमुर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमुर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी याचिका तात्काळ घ्यावी अशी विनंती केली. येणाऱ्या आठवड्यात अथवा पुढील आठवड्यात सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंती केली होती. पण खंडपीठाने सुट्टीच्या दिवसात सुनावणी घेण्यास नकार दिला. न्यायालयाकडून १४ जुलै रोजी रोजी सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली.

Belgaum Varta Belgaum Varta