Tuesday , March 3 2026
Breaking News

मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Spread the love

 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या युतीवर चर्चा सुरु आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मोठं पाऊल उचललं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने राज ठाकरे यांनी स्वत: मातोश्रीकडे जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत व शिवसेना नेते अंबादास दानवे देखील उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या सोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई देखील होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज सकाळी ११.३० वाजता दादरच्या शिवतीर्थ या निवासस्थानावरुन मातोश्रीकडे रवाना झाले. साधारण १२ वाजता राज ठाकरे हे मातोश्री या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे हे दोघेही स्वत: राज ठाकरेंना घेण्यासाठी गेले. त्यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य दिसत होते.

यानंतर उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना घेऊन मातोश्रीबाहेरील मंचावर आले. तेव्हा राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना लाल रंगाच्या गुलाबाचा पुष्पगुच्छ भेट म्हणून दिला. त्यासोबतच सदिच्छाही दिल्या. यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र फोटोसेशन केले. यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता. राज ठाकरेंच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांनी १० मिनिट थांबवण्याची विनंती केली. त्यानंतर उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना घेऊन घरी गेले. सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात अनौपचारिक चर्चा सुरु आहे.

कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त आज ‘मातोश्री’ निवासस्थानी जल्लोषाचे वातावरण आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुंबईसह राज्यभरातून हजारो शिवसैनिक मोठ्या उत्साहात दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे स्वतः प्रत्येक शिवसैनिकाला भेटत असल्याने कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ‘मातोश्री’ला फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली असून, ठिकठिकाणी शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले आहेत, जे कार्यकर्त्यांमधील उत्साह द्विगुणित करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

अजितदादांच्या विमानाचा अपघात नाही तर घातपात; रोहित पवारांना मोठा संशय

Spread the love  मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला बारामतीत विमान अपघातामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *