गुजरातमधील वनताराकडे जाण्याचा मार्ग मोकळा
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील जैन मठाच्या महादेवी हत्तीणीचा अखेर गुजरातमधील वनतारामध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात नांदणी मठाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मठाची याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे हत्तीणीसाठी केलेल्या प्रयत्नांवर पाणी फेरलं आहे. हत्तीणीला नेण्यासाठी वनताराची टीम आल्याचे नांदणीमधील ग्रामस्थ मध्यरात्री रस्त्यावर उतरले होते. दोन दिवसांपूर्वी मूक मोर्चाही काढण्यात आला होता. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाच्या आलेल्या निर्णयाने महादेवी हत्तीणीची रवानगी वनतारामध्ये होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने मठाधिपती जिनसेन भट्टारक पट्टाचार्य यांनी न्यायालयाचा निर्णय मान्य असल्याचे सांगत अधिक प्रतिक्रिया दिली नाही. उद्या मठात बैठक बोलावण्यात आल्याची माहिती दिली. दुसरीकडे, उच्च न्यायालयाकडून गुजरातमधील वनतारामध्ये हत्तीणीला पाठवण्यासाठी सूचना करण्यात आल्यानंतर नांदणीवासियांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Belgaum Varta Belgaum Varta