मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेतील पूर्णा आजीच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे निधन झाले. त्या ६९ वर्षांच्या होत्या. गेल्या ३-४ दिवसांपासून पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण अखेर आज त्यांची दुपारी ४च्या सुमारास प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानगृहात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुली आहेत. त्यातील तेजस्विनी पंडित ही मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
अभिनेत्री तेजस्विनी पंडितची आई म्हणजेच अभिनेत्री ज्योती चांदेकर सध्या “ठरलं तर मग” मालिकेत काम करत होत्या. त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्या पुण्याला गेल्या होत्या. तिथल्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज दुपारी ४ वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. गेल्या वर्षी मालिकेच्या शूटिंगदरम्यान त्या सेटवर आजारी पडल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या शरीरातील सोडियम कमी झाले होते. तेव्हा त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जवळपास दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर त्या पुन्हा मालिकेत परतल्या होत्या.

Belgaum Varta Belgaum Varta