
माणगांव (नरेश पाटील) : महाराष्ट्र राज्य उद्योगमंत्री ना. सुभास देसाई यांच्या हस्ते शनिवारी दि. ७ मे रोजी सायंकाळी ५ वा. जे. बी. सावंत एज्युकेशन सोसायटी बामणोली रोड माणगांव येथे प्रबोधन कौशल्य निकेतन पहिला टप्पाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला ना. सुभाष देसाई यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष (राज्य मंत्री दर्जा) ज.मो. अभ्यंकर, जे. बी. सावंत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अण्णासाहेब सावंत, शेठ दामजी लक्ष्मीचंद जैन धर्म स्थानक अध्यक्ष भरत शाह, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार व रायगड शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. संतोष कामेरकर उपस्थित राहणार आहेत.
या प्रबोधन कौशल्य निकेतनचे प्रशिक्षण व व्यवस्थापन पहल नर्चरिंग लाइव्हज करणार असून विशेष सहयोग जे. बी. सावंत एज्युकेशन सोसायटीतर्फे करण्यात येणार आहे.
यामध्ये परिचारिका मदतनीस, इलेक्ट्रिकल, फ्रीज व ए. सी. रिपेअर, बेसिक कॉम्प्युटर, मोबाईल रिपेअरिंग, स्पोकन इंग्लिश ई. कोर्सचा समावेश आहे. याशिवाय माणगांव तालुक्यातील महिला बचत गटांचे सर्व्हे केलेले असून बचत गटांचे सक्षमीकरण व आर्थिक उन्नतीसाठी नियोजनही केलेले आहे. हे कोर्स पूर्ण केल्यानंतर केंद्र शासनाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. आदिवासी समाजाला प्रवाहात आणण्यासाठी रोजगार व प्रशिक्षण या संस्थेत देण्यात येणार आहे. प्रबोधन संस्था संस्थापक व अध्यक्ष ना. सुभाष देसाई असून या संस्थेला ५० वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे या संस्थेने एक पाऊल पुढे टाकून मुंबई बाहेर प्रशिक्षण देण्याचे सुरू केलेले आहे. माणगांवच्या जनतेने ना. सुभाष देसाई यांच्या शब्दावर विश्वास ठेवून माणगावची सत्ता हातात दिल्यानंतर ना. सुभाष देसाई जनतेच्या विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत म्हणून डॉ. संतोष कामेरकर यांनी वार्तालाप करताना सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta