Sunday , December 7 2025
Breaking News

‘उद्यापासून आणखी कडक उपोषण, पाणी पिणं देखील बंद करणार’, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Spread the love

 

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण आंदोलन सुरू केले असून आज (३१ ऑगस्ट) आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील लाखो मराठा आंदोलक सहभागी झालेले आहेत. दरम्यान, या आंदोलनाबाबत अद्याप राज्य सरकारने कोणताही तोडगा न काढल्यामुळे मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे. ‘उद्यापासून आणखी कडक उपोषण करणार असून आता पाणी घेणंही बंद करणार आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे काय म्हणाले?
“तुम्हाला काय करायचे आम्हाला काही देणंघेणं नाही. आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत. तसेच शनिवारी आणि रविवारी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज घरी राहत नसतो. हे लक्षात ठेवा. आपण जे बोलतो तो करतो. तुम्ही फक्त पुढील शनिवारी आणि रविवारी पाहा. उद्यापासून कडक उपोषण सुरू करणार आहे. आता उद्यापासून पाणी पिणं देखील बंद करणार आहे”, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका
राजकीय आरक्षणासाठी सर्व धडपड सुरू आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा उल्लेख करताना केली. याचाही समाचार मनोज जरांगे पाटील यांनी घेतला. ते म्हणाले, “चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाच्या शिव्या खाऊ नयेत. चंद्रकात पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आमच्या दाखल्याच्या पडताळणी रोखून धरल्या होत्या. त्यामुळे इथून पुढे त्यांनी जास्त बडबड करू नये.”

आंदोलनाच्या नावाने पैसे मागणाऱ्यावर मनोज जरांगे संतापले
“आंदोलनाच्या ठिकाणी जे अन्नछत्र सुरु केले आहेत ते महाराष्ट्रातील लोकांनी आणि काही मुंबईतील लोकांनी केले आहेत. हे आंदोलकांनी समजून घ्या. अन्नछत्र जे सुरू केले आहेत ते एकएका व्यक्तीने सुरू केलेले आहेत. पण त्याच्या नावाखाली कोणीही पैसे कमवू नका. अन्यथा मी मीडियात त्या व्यक्तीचे नाव घेईन. परत म्हणू नका हे काय झाले. अन्नछत्र एकाने सुरू केलं आणि पैसे दुसरा गोळा करतोय. अशा पद्धतीने गरीबांचे रक्त पिण्याचे काम बंद करा. मी स्पष्ट सांगतो त्या व्यक्तीचे नाव घेईन, तो माझ्या कितीही जवळचा असला तरीही मी त्याचे नाव घेईन”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

“तुम्ही माझ्यासाठी गाडी घेऊन पळता म्हणून तुम्ही पैसे जमा करू शकत नाहीत. तुझ्या गाडीचे आतापर्यंत किती पैसे झाले ते आम्ही सर्व मराठा वर्गणी करून देतो. मी कोणाला बोलतो हे त्या व्यक्तीला कळत असेल. कारण त्या व्यक्तीने लोकसभेत देखील पैसे खाल्ले हे मलाही माहिती आहे. आताही रेनकोटच्या नावाखाली पैसे गोळा करत असेल तर मला हे जमणार नाही. रेनकोट एका व्यक्तीने वाटलेत. मला या ठिकाणी रेनकोट वाटप करायचे असं म्हणून लोकांकडून पैसे जमा केले जात आहेत. मात्र, असे भिकार धंदे बंद कर. तुझी माझ्या नजरेत प्रतिष्ठा आहे. मी स्पष्ट सांगतोय अन्यथा मी पुराव्यासह नाव जाहीर करेन”, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.

About Belgaum Varta

Check Also

दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही; प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णीचे वादग्रस्त वक्तव्य

Spread the love  मुंबई : गेल्या काही वर्षांपासून ममता अध्यात्माकडे वळलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी पुन्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *