मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात आज (2 सप्टेंबर) पुन्हा एकदा उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. आज दुपारी 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा, 3 पर्यंत सगळं सुरळीत झाले पाहिजे अन्यथा कोर्टाचा अवमान केला म्हणून कारवाई करु, असे मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिले आहेत. तसेच आज दुपारी 3 वाजता पुन्हा उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.
आज पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. कालच्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आंदोलक आणि राज्य सरकार, पोलीस यांच्यावर ताशेरे ओढले होते. तसेच 24 तासांत आझाद मैदान वगळता दक्षिण मुंबईतील सर्व परिसर खाली करण्याचे आदेश दिले होते. यानंतर आज पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी नामवंत विधिज्ञ सतीश मानेशिंदे यांनी मराठा समाजाची बाजू न्यायालयासमोर मांडली. त्यांनी मराठा आंदोलनकर्त्यांकडून झालेल्या त्रासाची मी मनोज जरांगे पाटील यांच्यावतीने माफी मागतो, असे सांगितले. मात्र, सरकारने आमच्यासाठी कुठेही नागरी सुविधांची व्यवस्था केली नव्हती. 5000 लोकांची परवानगी होती, पण पार्किंगची व्यवस्था फक्त 500 लोकांसाठी होती. इतर लोक हे स्वत:हून आले होते, असे सांगत सतीश मानेशिंदे यांनी मराठा आंदोलकांचा बचाव केला.
Belgaum Varta Belgaum Varta