

मुंबई : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन झाले. आज (28 नोव्हेंबर) सकाळी 6.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 68 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी फातेमा मिर्झा, मुलगा रमीज आणि महाजबी, हुमा या दोन कन्या असा परिवार आहे. दुपारनंतर अमरावतीमधल्या ईदगा कब्रस्तानमध्ये दफनविधी होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील धनज-माणिकवाडा हे त्यांचे मूळ गाव आहे. ते अमरावतीमधल्या नवसारी परिसरात ‘मिर्झा एक्स्प्रेस’ या घरात ते राहत होते.
डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचा जन्म 17 सप्टेंबर 1957 रोजी झाला होता. वयाच्या अकराव्या वर्षापासून त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली होती. तर 1970 पासून त्यांनी मंचावर कविता सादर करायला सुरुवात केली. त्यांनी वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखनही केल आहे. कृषी, शेतकऱ्यांच्या समस्या, ग्रामीण भागातील समस्या, सामाजिक समस्या, राजकीय विरोधाभास यांसारख्या विषयांवर ते नर्म विनोदी शैलीमध्ये लिखान करायचे. त्यांचे वडील मिर्झा रज्जाक बेग हे यवतमाळ जिल्ह्यातील प्रभावी राजकीय आणि सामाजिक व्यक्तिमत्व होते.
50 वर्षे विदर्भ-मराठवाड्यातील कवी संमेलनाचे केंद्रबिंदू राहिलेले डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांनी सहा हजारांवर काव्यमैफिलींचे सादरीकरण करून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळवली होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी ‘मिर्झा एक्स्प्रेस’ या काव्य मैफिलीचे सादरीकरण केले होते. त्यांचे एकूण 20 काव्यसंग्रह आहेत. मिर्झाजी कहिन हा त्यांचा स्तंभ प्रचंड लोकप्रिय आहे. वऱ्हाडी भाषेला देशभरात ओळख देणारे लोककवी म्हणून त्यांची ख्याती होती.
Belgaum Varta Belgaum Varta