
पुणे : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे आज सोमवारी निधन झाले. पुण्यातील पूना रुग्णालयात आढाव यांनी वयाच्या ९६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आढाव यांच्या निधनाने सर्वसामान्यांचा आवाज हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाची वार्ता अभिजीत वैद्य यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून बाबा आढाव यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना उपचारासाठी पुण्यातील पूना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, आज रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.
डॉ. बाबासाहेब पांडुरंग आढाव हे राज्यातील सामाजिक आणि श्रमिकांच्या चळवळीचे आधारस्तंभ मानले जायचे. ते सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी आणि कष्टकऱ्यांचे नेते होते. त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य असंघटित आणि वंचित कष्टकरी, विशेषतः हमाल, रिक्षाचालक आणि बांधकाम मजुरांच्या सन्मानासाठी समर्पित केले. आढाव यांनी जातीय भेदभावाविरुद्ध ‘एक गाव एक पाणवठा’ या चळवळीचेही नेतृत्व केले. त्यांनी समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला.
आढाव यांच्या निधनानंतर सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून श्रद्धांजली वाहिली. ‘बाबा, माझ्यासह अनेकांसाठी प्रेरणास्रोत होते. शिव-फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा, सत्यशोधकी विचारांचा मार्ग त्यांनी अधिक प्रशस्त केला. या विचारांची शिदोरी बाबांनी आमच्या ओंजळीत भरभरुन टाकली. ते अखेरच्या क्षणापर्यंत अगदी आजारपणातही जनतेच्या हितासाठी विशेषतः हमाल, रिक्षाचालक, कामगार, कष्टकरी आणि वंचित समूहाच्या उत्थानासाठी कार्यरत होते. असे त्या म्हणाल्या.
Belgaum Varta Belgaum Varta