

ठाणे : बेळगाव सीमा प्रश्नासंदर्भात सातारा येथे भरणाऱ्या ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आवाज घुमणार असे मत “बेळगाव कुणाच्या बापाचे” या पुस्तकाचे लेखक, युवा साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव यांनी व्यक्त केले.
बेळगाव सीमा प्रश्न हा बेळगाव सीमा भागातील मराठी जनतेच्या अस्तित्वाचा झाला आहे.तेथे सतत कर्नाटक सरकारकडून मराठी भाषेची उपेक्षा आणि गळचेपी होत असून मराठी जनतेवर कन्नड भाषा लादण्याची जणू दडपशाही हुकुमशाही दादागिरी सुरू आहे.या विरोधात बेळगाव सीमा भागात सतत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कर्नाटक सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येत असतात. बेळगाव सीमा भागातील मराठी जनता ‘मोडेन पण वाकणार नाही’ या लढाऊ वृत्तीतून लढत आहेत. बिदर भालकी कारवार निपाणी बेळगाव सीमा भागाविना संयुक्त महाराष्ट्र अधुरा आहे.
बेळगाव सीमा भागातील मराठी जनतेच्या तीन पिढ्या सातत्याने महाराष्ट्रात सामील होण्यासाठी संघर्ष करत आल्या आहेत आता चौथी पिढीही मोठ्या हिमतीने संघर्ष करायला सज्ज आहे. ‘मरेंगे तो महाराष्ट्र में, जियेंगे तो महाराष्ट्र में ‘ हे सीमा भागातील मराठी जनतेचे ब्रीद वाक्य आहे. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी शहीद झालेल्या १०६ हुतात्म्यांच्या बलिदानाला सार्थ अभिमान वाटावा आणि तेथील तमाम मराठी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी साहित्य संमेलनात साहित्यिक व सीमा भागातील मराठी जनतेच्या वतीने आवाज उठवणार असल्याचे मत त्यांनी बेळगाव वार्ताच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले कि, बेळगाव सीमा प्रश्नांबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रश्न प्रलंबित असताना कर्नाटक सरकार जाणून बुजून तेथील मराठी जनतेला कन्नड भाषा सक्तीची करून छळत आह. तसेच सीमा भागातील मराठी तरूणांना रोजगारही निर्माण करून देत नाही आहे. महाराष्ट्र सरकारही म्हणावे तसे प्रयत्न करताना दिसत नाही. तेथील मराठी जनतेच्या हक्कासाठी, हितासाठी विकासासाठी साहित्य संमेलनात ठोस चर्चा करण्यासाठी आवाज उठवणार अशी प्रतिक्रिया “बेळगाव कुणाच्या बापाचे” या पुस्तकाचे लेखक युवा साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव यांनी दिली.


Belgaum Varta Belgaum Varta