Tuesday , March 3 2026
Breaking News

शिवसेना-मनसे युतीची घोषणा, राज-उद्धव ठाकरेंनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले

Spread the love

 

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेली शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची अखेर बुधवारी घोषणा झाली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी वरळी येथील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मनसे-ठाकरे गटाच्या युतीची घोषणा केली. राज आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष मुंबईसह सात महानगरपालिकांमध्ये एकत्र लढणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचे युतीच्या घोषणेकडे लक्ष लागले होते. या पत्रकार परिषेदपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले होते. यावेळी रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे असे संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होते.

वरळीत झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी शिवसेना-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे मी जाहीर करतो, असे सांगितले. माझी एक मुलाखत झाली होती. त्यावेळी मी कुठल्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचे म्हटले होते. माझ्या त्या वाक्यापासून शिवसेना-मनसे एकत्र येण्याची सुरुवात झाली. कोण किती जागा लढणार, हे आम्ही आताच सांगणार नाही. कारण महाराष्ट्रात सध्या लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्या फिरत आहेत. त्यामध्ये आणखी दोन टोळ्यांची भर पडली आहे. ते राजकीय पक्षातील मुले पळवतात. शिवसेना-मनसेच्या दोन्ही पक्षातील उमेदवारांना अर्ज कधी भरायचा, हे सांगितले जाईल, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनीही आक्रमक भाषण केले. भाजपला मुंबईचे लचके तोडायचे आहेत, चिंधड्या करायच्या आहेत. आता आम्ही भांडत राहिलो तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांचा अपमान होईल. आम्ही कर्तव्य म्हणून एकत्र आलोय. आम्ही एकत्र आलोय, ते एकत्र राहण्यासाठी, हे मी पूर्वीच सांगितले आहे. यापुढे मुंबई आणि महाराष्ट्राकडे जो कोणी वाकड्या नजरेने पाहील त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. विधानसभा निवडणुकीत भाजपने कटेंगे तो बटेंगे असा अपप्रचार केला होता. आता मी मराठी माणसाला सांगतो की, आता चुकाल तर संपाल, त्यामुळे मराठीचा वसा टाकू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

अजितदादांच्या विमानाचा अपघात नाही तर घातपात; रोहित पवारांना मोठा संशय

Spread the love  मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला बारामतीत विमान अपघातामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *