Sunday , March 8 2026
Breaking News

महिला दिन विशेष : “मातृत्वाची दुहेरी किमया : जुळ्या मुलांच्या आईंची संघर्ष आणि आनंदाची कहाणी”

Spread the love

 

महिला म्हणजे सृजनाची शक्ती. तिच्या उदरातूनच नवीन जीवनाचा जन्म होतो आणि कुटुंबाला नवी दिशा मिळते. जुळ्या मुलांचे मातृत्व हे आनंदासोबतच मोठी जबाबदारी घेऊन येते. मात्र पती आणि कुटुंबाच्या सहकार्याने हा प्रवास अधिक सुंदर आणि सुखकर होतो, असा अनुभव जुळ्या मुलांच्या मातांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त “बेळगाव वार्ता”ने अशा काही मातांशी संवाद साधून त्यांच्या मातृत्वातील संघर्ष, आनंद आणि समानतेची भावना जाणून घेतली. “बेळगाव वार्ता”च्या मुलाखतीत मातांनी सांगितला संघर्ष, आनंद आणि कुटुंबाच्या साथीतला प्रवास..

                                  (- राधिका सांबरेकर)

माधुरी विनायक गडकरी

एम. कॉम पर्यंत शिक्षण झालेल्या माधुरी शिक्षक म्हणून नोकरी करत होत्या. माधुरी यांना “राजवीर” हा पहिला मुलगा. त्यानंतर निसर्गाने त्यांना सुंदर आणि गोड गिफ्ट दिले. 2022 मध्ये आधिरा व आधिराज या जुळ्या मुलांचा जन्म झाला. आपल्याला “जुळी” मुले आहेत हे समजल्यापासून ती जन्माला येईपर्यंतचा प्रवास आनंददायी होता. कारण पती विनायक गडकरी यांची साथ, सासूचे सहकार्य त्यामुळे गरोदरपणाचा काळ सुखकर झाला आणि आरोग्यपूर्ण मुलगा व मुलगी यांचा जन्म झाला. प्रसूतीनंतर मातृत्वाची खरी कसरत सुरू झाली. कारण मोठा मुलगा नवऱ्याकडे आणि दोन मुले माझ्याकडे माहेरी होती. चार महिने त्रास झाला. मग सकारात्मक दृष्टिकोन, मुलांचे चेहरे आणि नवऱ्याची साथ व आईची सेवा यामुळे दिवस कसे निघून गेले तेच कळले नाही. झोप आणि जेवण याचे भान न ठेवता आई-बाबा म्हणून मुलांना वाढविण्याचा प्रयत्न समानतेने केला. जुळ्या मुलांचे संगोपन करताना आर्थिक, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आई म्हणून बेस्ट देण्याचा प्रयत्न केवळ नवऱ्याच्या साथीमुळे शक्य झाला असे मत माधुरी गडकरी यांनी व्यक्त केले. “मातृत्व” ही देवाने दिलेली देणगी आहे. ते फुलण्यासाठी आई इतकाच बाबा महत्त्वाचा आहे. म्हणजे नवीन अंकुर उत्तम फुलतो. जुळ्या मुलांच्या रुपात आपल्याला डबल लॉटरी आली असल्याचे त्या म्हणतात.

सविता ज्ञानेश्वर सायनेकर

सकारात्मक दृष्टिकोन, देवावर विश्वास आणि कुटुंबीयांची पुरेपूर साथ यामुळे जुळी मुले होण्याचा अनुभव सुखकर होता. 2009 साली समर्थ आणि सार्थक या दोघांचा जन्म झाला. आज मुले सतरा वर्षाची झाली आहेत मात्र आजही मुलांच्या जन्मापासून ते वाढीपर्यंतचा प्रवास आठवतो. नारळपाणी, दूध आणि दर दोन तासाला गोळी असे पहिले तीन महिने गेले. मात्र पुढचे पाच महिने मन शांत ठेवून ऍक्टिव्ह राहायचे ठरवून वाटचाल केली. गरोदरपणात आपण जसे विचार करतो, वागतो तशी मुले घडतात. त्यामुळे आपले विचार, वातावरण, पतीचे सहकार्य खूप महत्त्वाचे ठरतात. आपल्या प्रसूतीचा अनुभव सांगताना त्या म्हणतात की, “नटून थटून डिलिव्हरी” असा अनुभव आपल्याला आला. कार्यक्रमाला जाण्यासाठी तयार झाले असतानाच अचानक त्रास झाला आणि ऍडमिट झाले आणि दोन जुळ्या मुलांचा जन्म झाला. डॉक्टर हे जणू देवाचाच अवतार आहेत असे त्या आवर्जून सांगतात. डॉ. उमदी यांच्याकडे प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली. मात्र दोन्ही मुले हेल्दी असल्याचे समाधान मोठे होते. पाच महिने आईकडे राहिल्यानंतर सासरी आल्यावर दोन्ही मुलांचे सांगोपन करताना पती ज्ञानेश्वर सायनेकर यांची जणू रात्रपाळी चालू झाली. दिवसभर ऑफिस आणि रात्री एक बाळ माझ्याकडे एक त्यांच्याकडे असायचे. दर दोन-तीन तासांनी भरवणे, झोपवणे हा नित्यक्रम सुरू असायचा. दिवसा आईकडे माहेरी एका मुलाला पाठवायचे आणि घरची कामे आवरायची. त्यात नणंद, जाऊ यांची देखील मोलाची साथ होती. जुळ्या मुलांचे मातृत्व अनुभवताना आई इतकाच बाबा देखील त्यांच्या संगोपनात बरोबरीने मदत करतो, असे त्या आवर्जून सांगतात.

आरशीन मलिकजान सनदी

“अल्लाह” की मर्जी के आगे किसी की नही चलती! पहिला एक मुलगा असून देखील जुळ्या मुलांचा जन्म म्हणजे डबल खुशी असे आरशीन म्हणतात. 2025 मध्ये ईशान आणि इजान यांचा जन्म झाला. दिसायला हुबेहूब असणारे दोघे गालावर असणाऱ्या तिळावरून ओळखून येतात. आरशीन या वयाने लहान असल्याने 2020 साली मोठ्या मुलाच्या जन्मानंतर 2025 मध्ये दुसऱ्या बाळाचा विचार केला परंतु “अल्लाह की देन से दो जुडवा बच्चे हुए” असे त्या आनंदाने सांगतात. जुळी मुले आहेत हे समजताच पहिला धक्का बसला. मग सासू आणि नवरा यांच्या सहकार्याने प्रसूतीपर्यंतचा काळ सुखकर होत गेला. मुलांच्या जन्मानंतर त्यांना सांभाळणे, मोठे करणे कसरतीचे होते. दोन्ही मुलांचे रडणे, भूक लागणे एकाच वेळी, आजारी पडणे देखील एकाच वेळी असायचे. त्यामुळे त्रास झाला पण कुटुंबीयांची साथ देखील मोलाची होती. आपल्या जुळ्या मुलांबद्दल सांगताना त्या म्हणतात की, जुडवा बच्चों को पाकर बहुत खुश है, लेकिन एक लडकी चाहिए थी असे त्या आवर्जून सांगतात.

नीता बबन कानशिडे

पती-पत्नी ही संसाररूपी रथाची दोन चाके आहेत. यामुळे जुळ्या मुलींचा सांभाळ करताना दोघांनी मिळून जबाबदारी पेलली असल्याचे शिक्षिका नीता बबन कानशिडे यांनी सांगितले.
पहिले आपत्य ही आनंदाची बाब. यामुळे जुळी मुले होणार हे समजताच प्रथम सांभाळ कसा होईल याची भीती वाटली. पण माहेरचा पाठिंबा पती बबन कानशिडे (सर) यांच्या सहकार्यातून प्रवास सुरू झाला. मुलींचा जन्मानंतर तीन महिने प्रसूती रजा व पुढे दोन महिने वैद्यकीय रजा वाढवून घेतली. मात्र यानंतर मुलींचे आवरून त्यांना माहेरी सोडून नोकरी सुरू ठेवली.
नोकरी, घर, जुळ्या मुली हे सांभाळताना तारेवरची कसरत होत होती. मात्र दोन्ही मुलींच्या बाललीला पाहिल्या की सारा त्रास सुखावह वाटायचा. मुली मोठ्या झाल्यानंतर त्यांच्याच मदतीने कुटुंबाची जबाबदारी पेलवताना त्रास जाणवला नाही. मुली दिसायला देखण्या, उच्चशिक्षित आहेत. दोन्ही मुली नोकरी आणि घर या दोन्ही जबाबदाऱ्या आनंदाने सांभाळतात. “त्या” सासरी आनंदाने नांदत असल्याने आम्ही धन्य झाल्याचे त्या आवर्जून सांगतात.
मातृ सुख ही देवाची कृपा असून त्याचा अनुभव आईला आनंददायी असतो. मुलींना उच्चविद्याविभूषित करून कोणताही भेद न ठेवता वाढविणे ही मोठी जबाबदारी असून आमच्या मुलींचा आम्हाला अभिमान आहे असे त्या म्हणतात.

About Belgaum Varta

Check Also

कमांडो कोचिंग इन्स्टिट्यूट!!!!

Spread the love  PHYSICAL BATCH ADMISSION OPEN FOR BELGAUM ARO 2023. FEE RS. 8000/MONTH INCLUDES …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *