महाराष्ट्र एकीकरण समिती शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठा मंदिर येथील कोविड केअर सेंटर येथे लसीकरण केंद्र सुरु करण्यास जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कोविड केअर सेंटरच्या दत्ता जाधव, मदन बामणे, सागर पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण संदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची भेट घेऊन चर्चा केली.
कांही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्राच्या ठिकाणी थांबून फॉर्म भरला पाहिजे असे सांगत लसीकरणाचे राजकारण करू पाहत आहेत अशी तक्रार त्यांनी केली. त्यावर जिल्हाधिकारी यांनी तसे कांहीही नाही, साध्या आधार कार्डवर लसीकरण होऊ शकते, असे स्पष्टपणे सांगितले.
त्याचप्रमाणे ठराविक लोकांचेच लसीकरण केले जाणार आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना जिल्हाधिकाऱ्यांनी पंतप्रधानांनी दिलेल्या आदेशानुसार सरसकट सर्व नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. त्याचप्रमाणे 18 वर्षाखालील मुलांसाठी लसीकरणासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे, अशी माहिती दिली.
यावेळी दत्ता जाधव, मदन बामणे, सागर पाटील आणि बालाजी जोशी यांनी प्रशासनाने सुरू केलेल्या लसीकरणाच्या मोहिमेस समितीचे कोविड केअर सेंटर सहकार्य करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. त्यावेळी तुम्हाला मराठा मंदिर येथे लसीकरण मोहीम राबविण्याची इच्छा असेल तर रीतसर अर्ज करा. उद्याच्या उद्या तुम्हाला लसीकरणाची परवानगी दिली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मदन बामणे म्हणाले की, संपूर्ण देशभरात 18 वर्षे वयोगटात वरील सर्व नागरिकांना सध्या कोव्ही शिल्ड ही कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने देखील शहर आणि तालुक्यात ठिकाणी लसीकरणाला सुरुवात केली आहे. प्रत्येक नागरिकाने ही लस घेणे अत्यावश्यक असून त्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती आपल्यापरीने जनजागृती करत आहे.